Election Result 2022: उत्तर प्रदेशसह एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर आता दोन तासांनी महत्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. पहिल्या कलांमध्ये भाजपानं मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर पंजाबमध्ये 'आप'नं काँग्रेस अन् भाजपाला 'जोर का झटका' दिल्याचं दिसत आहे. पहिल्या दोन तासांत काय घडलं वाचा १० महत्वाचे मुद्दे...
१. उत्तर प्रदेशात ४०३ जागांपैकी ३०० हून अधिक जागांचे पहिले कल हाती आले आहेत. यात भाजपानं मोठी मुसंडी मारली असून २२० जागांवर भाजपानं आघाडी घेतली आहे. तर समाजवादी पक्षानं ८३ जागांवर आघाडी प्राप्त केली आहे. काँग्रेस ५, तर बसपा ४ जागांवर आघाडीवर आहे.
२. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर मतदार संघातून ५,५०० मतांनी आघाडीवर आहेत. तर अखिलेश यादव करहल मतदार संघातून आघाडीवर आहेत.
३. पंजाबमध्ये सर्वात मोठा बदल घडताना दिसत आहे. आम आदमी पक्षानं यावेळी काँग्रेस आणि भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. पहिल्या दोन तासांतच 'आप'कडे बहुमताचा आकडा प्राप्त झाला आहे. पंजाबमध्ये ११७ जागांपैकी 'आप'कडे ८४ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस १७ आणि भाजपा केवळ ४ जागांवर आघाडीवर आहे.
४. गोव्यात क्षणाक्षणाला मोठ्या घडामोडी घडत आहेत. सुरुवातीच्या तासाभरात काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. पण आताचं चित्र पाहता गोव्यात भाजप २० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस १३ जागांवर आघाडीवर आहे. टीएमसी आणि मित्र पक्ष ४ जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात शिवसेनेची निराशा झाली आहे. तर आप एका जागेवर आघाडीवर आहे.
५. गोव्यात पणजीतून निवडणूक लढवत असलेले उत्पल पर्रिकर पिछाडीवर आहेत. तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील पिछाडीवर आहेत.
६. पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. नवज्योतसिंग सिद्धू पहिल्या दोन तासांच्या मतमोजणीनंतर थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. तसंच कॅप्टन अमरिंदर सिंग देखील ५ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. मुख्यमंत्री चन्नी देखील दोन्ही मतदार संघात पिछाडीवर आहेत. शिरोमणी अकाली दलाचे प्रकाश सिग बादल देखील पिछाडीवर आहेत. पंजाब सरकारमधील सध्याचे बहुतांश मंत्री पिछाडीवर आहेत.
७. मणिपूरमध्ये भाजपानं दणदणीत आघाडी घेतली आहे. मणिपूर विधानसभेच्या ६० जागांपैकी २८ जागांवर भाजपानं आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला फक्त ९ जागांवर आघाडी घेता आली आहे.
८. उत्तराखंडमध्येही भाजपानं मुसंडी मारली आहे. ७० पैकी ४३ जागांवर भाजपानं आघाडी घेतली आहे. तर २३ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये आपला अद्याप खातं उघडता आलेलं नाही. तर ४ अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.
९. पंजाबमध्ये अभिनेता सोनू सूदची बहिण मालविका सूद मोगा मतदार संघातून पिछाडीवर आहे.
१०. पहिल्या दोन तासांचे कल पाहता. उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या चारही राज्यांमध्ये भाजपा आघाडीवर आहे. तर पंजाबमध्ये 'आप'नं मोठं यश प्राप्त केलं आहे.