ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 11 - आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 203 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री उत्तर प्रदेशमध्ये बनेल हे निश्चित आहे. पण कोण असेल उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री भाजपाचे युपी प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य, योगी आदित्यनाथ की सध्या केंद्रीय गृहमंत्री असलेले राजनाथ सिंहच बनतील पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री?
एग्झिट पोलमध्ये भाजपा बहुमताच्या जवळ पोचेल असा अंदाज बहुतेकांनी व्यक्त केला. तर चाणक्यने भाजपाला 303 जागांसह दणदणीत बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला. चाणक्यचा अंदाज खरा ठरेल अशी चिन्हे आहेत. केशवप्रसाद मौर्य यांनीही भाजपाला दोन तृतीयांश जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागेल हे निश्चित आहे. समाजवादी पक्षाला सत्तेतून पायउतार व्हावे लागेल हे नक्की आहे.
मायावतींचेही पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. समाजवादी पार्टी व काँग्रेस आघाडीला 80 च्या आसपास जागा मिळतील, बसपाला 30 च्या आसपास जागा मिळतील आणि भाजपा 280 च्या आसपास धडक मारेल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे कोण असेल भाजपाचा मुख्यमंत्री अशी चर्चा झडायला सुरूवात झाली आहे.
उत्तरप्रदेशात भाजपा 1985 पासून निवडणूक लढवत आहे. पहिल्या निवडणुकीत भाजपाने 16 जागा जिंकल्या होत्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा 328 जागांवर आघाडीवर होती. नरेंद्र मोदींची ही लाट अद्यापही कायम असून भाजपा 280 हून जास्त जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात 26 वर्षांनी पुन्हा भाजपाला सत्ता मिळेल असं स्पष्ट होत आहे.