पाटणा - बिहारमधील कुशेश्वरस्थान आणि तारापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने महाआघाडी मोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. मात्र या दोन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून, दोन्ही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
या पोटनिवडणुकीत सत्ताधारी जनता दल युनायटेडने दोन्ही जागांवर आपला कब्जा कायम ठेवला आहे. दोन्ही ठिकाणी जेडीयूला कडवी टक्कर दिली. तर नवा पक्ष लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) आणि नव्या चिन्हासह उतरलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाने तिसरे स्थान पटकावले. मात्र या लढाईच काँग्रेसची अवस्था बिकट झाली काँग्रेसचे उमेदवार चौथ्या स्थानावर फेकले गेले.
बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आव्हान देणाऱ्या काँग्रेसला अनामत रक्कम वाचवण्यासाठी आवश्यक असलेली मतेही घेता आली नाहीत. मतांचा विचार केल्यास काँग्रेसची स्थिती चिराग पासवान यांच्या नवख्या पक्षापेक्षा वाईट झाली. नियमानुसार कुठल्याही उमेदवाराला डिपॉझिट वाचवण्यासाठी एकूण मतदानापैकी १६.६६ टक्के मते मिळणे आवश्यक असते. कुशेश्वर स्थान येथून काँग्रेसचे उमेदवार अतिरेक कुमार याला ४.२७ टक्के मते मिळाली. तर तारापूर येथे काँग्रेस उमेदवार राजेश मिश्रा केवळ २.१० टक्के मते मिळवू शकले. त्यामुळे एकूण मतदानात पक्ष केवळ ३ टक्के मते मिळवण्यात यशस्वी ठरला.
बिहारमधील पोटनिवडणुकीत कुशेश्वरस्थान येथे काँग्रेस उमेदवार अतिरेक कुमार यांना एकूण पाच हजार ६०२ मते मिळाली. जी एकूण मतांच्या केवळ ४.२७ टक्के आहेत. तर तारापूरमध्ये काँग्रेस उमेदवार राजीव मिश्रा यांना ३ हजार ५७० मते मिळाली ही एकूण मतदानाच्या केवळ २.१० टक्के आहे. दोन्ही मतदारसंघात मिळून झालेल्या एकूण ३ लाख ३६७ मतदानापैकी केवळ ९ हजार १७२ मते काँग्रेसला मिळाली.