ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - उत्तर प्रदेशमधला भाजपाचा विजय म्हणजे जनतेने मोदींच्या नोटाबंदीला दिलेला पाठिंबा मानला जात आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी कठोर उपाय योजण्याची ताकद मिळण्याची शक्यता आहे. नोटाबंदी केल्यानंतर मोदींनी आपण आणखी कठोर उपाय योजणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी बेनामी मालमत्ता, सोने खरेदीचे व्यवहार, विदेशी बँक खाती, राजकीय पक्षांना देणग्या आणि आयकराच्या जागी ट्रॅन्झॅक्शन टॅक्स अशा अनेक गोष्टींचा समावेश असू शकतो.
नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास झाला आणि त्याचा फटका उत्तर प्रदेश निवडणुकीत बसेल अशी अनेकांची अटकळ होती. मात्र, मोदींनी युपीच्या निवडणुकीची सुत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली आणि अमित शहांच्या साथीने उत्तर प्रदेश पिंजून काढला. नोटाबंदीच्या मुद्याला स्पर्श करण्याचे टाळत त्यांनी लोकांनी विकासाची आश्वासने दिली, काही प्रमाणात मतांच्या ध्रुवीकरणाची वाट चोखाळली आणि अद्यापही सर्वसामान्यांच्या मनावर मोदींचं गारूड असल्याचं दिसून आलं.
या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं दिसून आल्यामुळे मोदी साहसी पावले नजीकच्या काळात उचलतील आणि उच्चवर्ग व गरीब यांचा विचार केला तर आपण गरीबांच्या बाजुने असल्याचं दाखवण्याची संधी ते सोडणार नाहीत. साहजिकच बेनामी मालमत्ता, सोन्याची खरेदी आणि विदेशी बँकांमधील खाती यासारख्या प्रकरणामध्ये कठोर कायदे उचलली जाण्याची शक्यता आहे. मोदी नजीकच्या सहकाऱ्यांनाही त्यांच्या मनात काय आहे हे सांगत नाहीत. त्यामुळे अत्यंत अचानकपणे ते मोठा धक्का देऊ शकतात. उत्तर प्रदेशच्या निवडणूक निकालामुळे आता असे काही धक्के येत्या काळात बघायला मिळतील अशी शक्यता आहे.