ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - दोन दिवसांपूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसंबंधी एक्झिट पोलमधून अंदाज वर्तवण्यात आला होता. सहा एक्झिट पोलमधून जनमताचा कौल जाणून घेण्यात आला होता. त्यातील चार एक्झिट पोल्सनी भाजपा उत्तरप्रदेशात सर्वात मोठा पक्ष ठरेल पण उत्तरप्रदेश विधानसभा त्रिशंकू राहील असा अंदाज व्यक्त केला होता आणि दोन एक्झिट पोल्सनी भाजपा पूर्ण बहुमताने सत्तेत येईल असे म्हटले होते.
या एक्झिट पोल्सपैकी चाणक्यचा एक्झिट पोल बरोबर ठरला आहे. टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने भाजपाला सत्ता मिळेल असे म्हटले होते. टुडेज चाणक्यने उत्तरप्रदेशात भाजपा 285 जागा जिंकून पूर्ण बहुमताने सत्तेत येईल असे म्हटले होते. सध्या भाजपा त्यापेक्षाही पुढे आहे. पण चाणक्यला जनमताचा नेमका कल ओळखता आला असे त्यातून दिसते. चाणक्याने सपा-काँग्रेस आघाडीला 88, बसपा 27 आणि अऩ्य 3 जागा मिळतील असे म्हटले होते.
काय होता एक्झिट पोलचा अंदाज-
- टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये 403 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला 190 ते 210 जागा मिळण्याची शक्यता, समाजवादी पक्ष - कॉंग्रेसला 110 ते 130 जागा, बहुजन समाज पक्षाला 54 ते 57 जागा .
- नेटवर्क- 18 च्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपा 185 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर समाजवादी पक्ष -काँग्रेसला 120 जागा आणि बसपला 90 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- एबीपी माझा-सीएसडीएस'च्या एक्झिट पोलमधील आकडेवारी वेगळी आहे. यामध्ये भाजपला 164-176 जागा, सपा-काँग्रेसला 156-169 जागा , बसपला 60-72 जागा आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- इंडिया टीव्ही-सीव्होटरने केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठी पार्टी बनेल. यानुसार भाजपाला 185 जागा , समाजवादी पक्षाला 120 जागा आणि बसपाला 90 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे