Election Results 2023 Live Updates : राजस्थान 'परंपरा' राखणार, तेलंगणात 'शॉक' बसणार; पाहा चार राज्यांमध्ये कुणी घेतलीय आघाडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 10:45 AM2023-12-03T10:45:35+5:302023-12-03T10:51:19+5:30
Election Results 2023 Live Updates : सकाळी दहा वाजेपर्यंत मिळालेल्या कलानुसार, भाजप मध्यप्रदेशातील सत्ता कायम ठेवत आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी आज मतमोजणी होत आहे. या चार राज्यांचे निवडणूक कल आता समोर येत आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत मिळालेल्या कलानुसार, भाजप मध्यप्रदेशातील सत्ता कायम ठेवत आहे. राजस्थानमध्ये परंपरा राखली जाण्याची शक्यता असून भाजप सत्तेत येत असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच, राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होते, त्याचप्रमाणे यंदाही असेल, असे सुरुवातीच्या कलामधून दिसते. तेलंगणामध्ये सत्ताधारी बीआरएसला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, तेलंगणात काँग्रेस बहुमताकडे जोराने वाटचाल करत आहे. याशिवाय, छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.
(मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!)
मध्य प्रदेशात भाजप आघाडीवर
मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा असून स्पष्ट बहुमतासाठी ११६ जागांची गरज आहे. २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मध्य प्रदेशात यंदा विक्रमी 76.22 टक्के मतदान झाले. हे विक्रमी मतदान भाजपच्या पथ्यावर पडलेले दिसत आहे. दरम्यान, सकाळी दहा वाजेपर्यंतच्या कलानुसार, भाजपने १४० जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस ८५ जागांवर आघाडीवर आहे.
राजस्थान 'परंपरा' राखणार
राजस्थानमध्ये विधासभेच्या २०० जागा आहेत. त्यापैकी १९९ जागांवर मतदान झाले आहे. आतापर्यंत या ठिकाणी पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. यंदा सुद्धीा राजस्थान ही परंपरा राखणार असल्याचे दिसून येत आहे आहे. सकाळी दहा वाजेपर्यंतच्या कलानुसार, १९९ पैकी १०६ जागांवर भाजपने आघाडी घेत काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेस ८१ जागांवर आघाडीवर आहे.
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस
छत्तीसगड विधानसभेसाठी ९० जागांवर मतदान झाले. छत्तीसगडमध्ये २०१८ नंतर १५ वर्षांनी काँग्रेस सत्तेत आली होती. परंतु आता काँग्रेसला सत्ता राखण्यासाठी चुरशीची लढत करावी लागत आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच टक्कर दिसत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंतच्या कलानुसार, काँग्रेसने ४५ जागांवर आघाडी घेतली असून भाजप ४३ जागांवर आघाडीवर आहे. दोन ठिकाणी इतरांना यश मिळाले आहे.
तेलंगणात काँग्रेस सत्तेवर येणार?
तेलंगणात विधानसभेसाठी ११९ जागांवर मतदान झाले. या ठिकाणी के.चंद्रशेखर राव याचा बीआरएस पक्ष सत्तेतून जात आहे. तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून सुरुवातीच्या आकडेवाडीनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेस ६५ जागांवर आघाडीवर असून बीआरएस ४२ जागांवर आघाडी घेत आहे. भाजपा ८ आणि एमआयएम २ जागांवर सध्या पुढे असल्याचे दिसून येत आहे.