पाच राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर आज 4 राज्यांमध्ये मतमोजणी सुरू आहे. यामध्ये तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल सोडला, तर उर्वरित 3 राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी फारशी चांगली नाही. याच दरम्यान, तृणमूल काँग्रेसने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
तीन राज्यांमध्ये भाजपा विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यावर आता तृणमूल काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची उत्कृष्ट कामगिरी ही भगव्या पार्टीच्या यशापेक्षा काँग्रेसचं अपयश जास्त आहे असं टीएमसीने म्हटलं आहे.
छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, भाजपा पुढे
भारतीय निवडणूक आयोगाच्या दुपारी ४ वाजेपर्यंतच्या निकालांच्या आकडेवारीनुसार, काँग्रेसशासित छत्तीसगड राज्यात भाजपा 90 पैकी 48 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 40 जागांवर आहे. तर इतरला दोन जागा आहेत.
राजस्थानमध्ये भाजपाचा होतोय विजय
याशिवाय, दुसरं काँग्रेसशासित राज्य राजस्थानमध्ये भाजपा 199 पैकी 114 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी सत्ताधारी पक्ष काँग्रेसकडे केवळ 71 जागा आहेत. अपक्ष 12 जागांवर, तर बसपाला 2 जागांवर आहे.
मध्य प्रदेशात भाजपा सरकारची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर
मध्य प्रदेशातील आकडेवारीनुसार, येथे भाजपाची सत्ता असल्याचं दिसतं. राज्यातील 230 जागांपैकी भाजपा 157 जागांवर, काँग्रेसला 72 जागा आणि इतरला 1 जागा आहे.
तेलंगणात काँग्रेसची चांगली कामगिरी
काँग्रेस तेलंगणात चांगली कामगिरी करत आहे. आकडेवारीनुसार, काँग्रेस 119 पैकी 68 जागांवर आघाडीवर आहे, तर भारत राष्ट्र समिती (BRS) 38 जागा, भाजपा 5 जागा, AIMIM 7 आणि इतरला 1 जागा आहे.