नवी दिल्ली - राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली. महाराष्ट्रातील 7 जागांसह देशातील 17 राज्यांतील राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. या जागांवरील सध्याच्या सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळेच, 26 मार्च रोजी या 55 जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे.
राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून 6 मार्च रोजी अर्ज उपलब्ध होणार आहेत. 13 मार्चपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. 16 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर, 18 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर, 26 मार्च रोजी राज्यसभेच्या 55 जागांसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली आहे. तर मतदानादिवशीच म्हणजे 26 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन नवनिर्वाचित राज्यसभाखासदारांची घोषणा होईल. त्यामुळे, महाराष्ट्रातील भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांकडून आता नवीन सदस्यांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कारण, महाराष्ट्रात महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याने सगळी गणिते बदलली आहेत.