ऑनलाइन लोकमत
देहराडून, दि. 11 - उत्तर प्रदेशसोबतच उत्तराखंडमध्येही मोदी लाटेच्या प्रभावात काँग्रेस भुईसपाट झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत हे दोन मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.
हरिश रावत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भाजपाला कडवी टक्कर देणार, असे संकेत मिळत होते. मात्र भाजपाच्या झंझावात काँग्रेसचा देवभुमीमधील गडही कोसळला. त्याबरोबर काँग्रेसचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनाही आपला पराभव टाळता आला नाही. रावत यांना हरिद्वार (ग्रामीण) मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. सोबतच रावत यांना किच्चा मतदार संघातूनही अवघ्या 92 धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला.
सध्या येत असलेल्या कलांमध्ये उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांपैकी 51 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय बीएसपी आणि अन्य 4 जागांवर आघाडीवर आहे. 70 सदस्यांच्या उत्तराखंड विधानसेत 15 फेब्रुवारी रोजी 69 जागांसाठी मतदान झाले होते.