ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - आज जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. पंजाबमध्ये बहुमत आणि गोव्यात चांगल्या जागा मिळतील, या अपेक्षेवर असलेल्या आपच्या पदरी निकालांमधून निराशा पडली आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसने अकाली दल आणि भाजपा आघाडीला सत्तेतून बाहेरची वाट दाखवताना काँग्रेसने एकहाती बहुमताच्या दिशेने कूच केली आहे. तर जोरदार प्रचार यंत्रणा राबवून पंजाबचे राजकीय वारे आपच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आम आदमी पक्षाला केवळ 21 जागांवर आघाडी मिळवता आली आहे.
गोव्यामध्येही आपच्या पदरी निराशा पडली आहे. गोव्यात आपला खातेही उघडता आलेले नाही. त्यामुळे दिल्लीत बंपर विजय मिळवल्यानंतर देशातील अन्य राज्यात विस्तार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आम आदमी पक्षाला धक्का बसला आहे.