ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 11 - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले असून भाजपा समर्थकांची भगवी होळी खेळण्याची इच्छा पुर्ण होताना दिसत आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे देशात मोदी लाट नाही असं वारंवार म्हणणा-या विरोधकांना चोख उत्तर मिळालं आहे. देशात अद्यापही मोदी लाट कायम असल्याचं दिसत असून भाजपाने 1991 चा रेकॉर्ड तोडला आहे. 1991 मध्ये मंदिर लाटेवर निवडून आलेली भाजपा यावेळी मोदी लाटेवर निवडून आली आहे. विशेष म्हणजे मंदिर लाटेपेक्षा मोदी लाट जास्त वेगाने आल्याचं दिसत आहे.
भाजपाला 1991 नंतर पहिल्यांदाच उत्तरप्रदेश निवडणुकीत इतकी मोठी आघाडी मिळाली आहे. 1991 मध्ये 419 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा 221 जागांसह बहुमत मिळवत सत्तेत आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाने राम मंदिराचा मुद्दा उचलला होता. मात्र या निवडणुकीत राम मंदिराचा उल्लेखही झाला नाही. 1991 मध्ये काँग्रेसला फक्त 46 जागा मिळाल्या होत्या. भाजपाला 31.76 टक्के मतं मिळाली होती. भाजपाला त्यावेळी 280 हून जास्त जागा आणि 40 टक्के मतं मिळण्याची आशा होती.
उत्तरप्रदेशात भाजपा 1985 पासून निवडणूक लढवत आहे. पहिल्या निवडणुकीत भाजपाने 16 जागा जिंकल्या होत्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा 328 जागांवर आघाडीवर होती. नरेंद्र मोदींची ही लाट अद्यापही कायम असून भाजपा 200 हून जास्त जागांवर आघाडीवर आहे.
काय होता 1991 मधील निवडणूक निकाल -
भाजपा - 221
काँग्रेस - 46
बसपा - 12
जनता दल - 92
जनता पार्टी - 34
बहुतांश एक्झिट पोल्सनी आणि सट्टा बाजाराने उत्तरप्रदेशात भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. उत्तरप्रदेश देशातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशचा निकाल देशातील सद्य राजकीय समीकरणे बदलू शकतो तसेच दोन वर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही हा निकाल महत्वाचा ठरणार आहे. उत्तरप्रदेशचे राजकारण जवळून पाहणा-या राजकीय विश्लेषकांना या राज्यांत कोणालाच बहुमत मिळणार नाही, असेच वाटत होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आमच्या आघाडीलाच बहुमत मिळेल, असा दावा केला होता.
काय होता एक्झिट पोलचा अंदाज-
- टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये 403 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला 190 ते 210 जागा मिळण्याची शक्यता, समाजवादी पक्ष - कॉंग्रेसला 110 ते 130 जागा, बहुजन समाज पक्षाला 54 ते 57 जागा .
- नेटवर्क- 18 च्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपा 185 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर समाजवादी पक्ष -काँग्रेसला 120 जागा आणि बसपला 90 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- एबीपी माझा-सीएसडीएस'च्या एक्झिट पोलमधील आकडेवारी वेगळी आहे. यामध्ये भाजपला 164-176 जागा, सपा-काँग्रेसला 156-169 जागा , बसपला 60-72 जागा आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- इंडिया टीव्ही-सीव्होटरने केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठी पार्टी बनेल. यानुसार भाजपाला 185 जागा , समाजवादी पक्षाला 120 जागा आणि बसपाला 90 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे