तेलंगणात सत्तांतराचे वारे वाहू लागले असून विधानसभा निवडणुकांच्या निकालात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तेलंगणातील ११९ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून काँग्रेसने मोठी आघाडी घेतल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. वेगवेगळ्या सर्वेक्षणातून तेलंगणात केसीआर यांची सत्ता संपुष्टात येत असल्याचे दिसून आले होते. आज सकाळी निवडणूक निकाल हाती येत असताना काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर, बीआरएस दुसऱ्या क्रमांकावर असून गत निवडणुकीत केवळ १ जागा जिंकलेल्या भाजपलाही ८ ते १० जागांवर आघाडी असल्याचे दिसते. काँग्रेसच्या या आघाडीमुळे तेलंगणात काँग्रेस समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार तेलंगणात काँग्रेसने ६४ जागांवर आघाडी घेतली असून बीआरएसने ३६ जागांवर आघाडी घेतल्याचं चित्र आहे. त्यामुळेच, काँग्रेस समर्थकांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. तेलंगणाच्या हैदराबादमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर समर्थकांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. काँग्रेस कार्यालयाबाहेर एकमेकांना लाडू वाटून आनंदोत्सव साजरा होत आहे. विशेष म्हणजे, बाय बाय केसीआर.. अशी घोषणाबाजीही यावेळी काँग्रेस समर्थकांकडून करण्यात येत आहे.
काँग्रेस समर्थकांनी सोनिया गांधींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत फुलांची उधळण केली. साऊथस्टाईल जल्लोष करत काँग्रेस समर्थकांनी राज्यातील सत्तांतरावर आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी मैदानात उतरुन काँग्रेसमध्ये प्रचार केला होता. तर, भाजपानेही दक्षिण भारतात जोर लागला होता. काँग्रेसला अपेक्षाप्रमाणे येथे यश मिळाले असून बीआरएसला मागे टाकण्यात काँग्रेसला यश आले. एमआयएमलाही राज्यात म्हणावे तेवढे यश मिळाल्याचे दिसत नाही. पण, भाजपने १ जागेवरुन आता ८ ते १० जागांएवढी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आम्हीच सरकार स्थापन करू. तेलंगणात आम्हीच सत्तेवर येऊ, जिंकू, असा विश्वास बीआरएसच्या आमदार आणि के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी व्यक्त केला आहे. मात्र, सध्यातरी काँग्रेसने आघाडी घेतल्याचं चित्र तेलंगणात आहे. हैदराबाद येथील ९ विधानसभा मतदारसंघात एमआयएमनेही उमेदवार उभे केले आहेत. तर, पवनकल्याण यांच्या जनसेवा पक्षाने ८ जागांवर निवडणूक लढवली असून ते भाजपासोबत युतीमध्ये आहेत.