शरद गुप्ता, नवी दिल्ली
लखनौ - आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये विविध एजन्सींमार्फत करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणातून भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. मात्र, योगी आदित्यनाथ यांच्या मंत्री मंडळातील मंत्री आणि आमदार एकापाठोपाठ एक राजीनामा देत आहेत. भाजपला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षात प्रवेश करत आहेत. भाजपच्या तिसऱ्या मंत्र्याने आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. जर सर्वेक्षणातून भाजपला बहुमत दिसत असेल, तर हे आमदार, मंत्री राजीनामा का देत आहेत? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
भाजपला सोडचिठ्ठी देत इतर पक्षांसोबत जाणारे हे नेते संघाचे किंवा मूळ भाजप पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. सन 2017 च्या निवडणुकीत हे सपा आणि बसपाला सोडून भाजपात आले होते. राजभर, मौर्य, बिंद, प्रजापती, वर्मा, सागर यांसारखे आडनाव असलेले हे नेते अतिमागास आणि दलित प्रवर्गातून येतात. गेल्या निवडणुकीत 403 पैकी 325 जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. त्यामुळे, निवडणुकीनंतर काही नेते मंत्री बनले. मात्र, या मंत्र्यांना सन्मान मिळत नसल्याचा आरोप मंत्र्यांकडून होत आहे. वनमंत्री दारासिंह यांचा आरोप होता की, त्यांचे सचिव त्याचं काम ऐकत नाहीत. तर, मुख्यमंत्री त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत. तसेच, स्वामी प्रसाद मौर्य यांना श्रम मंत्रालय देण्यात आले होते, जे पद त्यांच्या ज्येष्ठतेनुसार योग्य वाटत नव्हते. तर, सैनी यांना राज्यमंत्रीपदाचा पदभार देण्यात आला होता.
दरम्यान, 2016 मध्ये मौर्य यांनी भाजपमध्ये सहभागी होताना, 15 जागा मागितल्या होत्या. 2017 च्या निवडणुकीत त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली. त्यापैकी 12 नेते आमदारही बनले. पराभूत झालेल्यांमध्ये मौर्य यांच्या मुलाचाही समावेश होता. मात्र, यावर्षी मौर्य यांना केवळ 5 जागा देण्यास भाजप तयार होती. त्यामुळे, मौर्य यांनी भाजपला रामराम केला. स्वामी प्रसाद आणि दारा सिंह हे नेते लोकांशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे, केवळ मत फोडण्यातच नाही, तर उमेदवार निवडून आणण्याच ताकदही ते ठेवतात. अनुप्रिया पटेल, मौर्य आणि दारासिंह यांनी योगी आदित्यनाथ यांची तक्रारही गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा काहीही निर्णय घेऊ शकत नाहीत.