पाटणा - निवडणूक रणनीतीचा बादशहा प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जदयूत प्रवेश केला आहे. काही दिवसांपासून जनता दल युनायटेडमध्ये प्रशांत किशोर प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.
इंडिया पॉलिटिकल अॅक्शन कमिटीचे संस्थापक प्रशांत किशोर रविवारी (16 सप्टेंबर) जदयूच्या कार्यकारिणी बैठकीत सहभागी झाले. प्रशांत किशोर यांनी स्वत: ट्वीट करून आपला नवा प्रवास सुरू करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
प्रशांत किशोर यांच्या नव्या प्रवासाबाबत विचारलं असता जदयूचे नेते के. सी. त्यागी यांनी 'अधिकृत घोषणेची वाट पाहा, आता त्यांनी फक्त त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त केल्याचं म्हटलं होतं. आमच्या पक्षात आम्ही त्याचं स्वागत करू' असंही त्यागी म्हणाले होते.
निवडणूक जिंकणं ही एक कला आहे आणि प्रशांत किशोर यांनी त्यातील 'मास्टरी' सिद्ध केली आहे. भारतीय मतदारांची नाडी त्यांनी अचूक ओळखली. त्यामुळे 2012ची गुजरात विधानसभा निवडणूक असो किंवा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी 2014ची लोकसभा निवडणूकीत प्रशांत किशोर यांनी चमत्कार करून दाखवला होता. भाजपाच्या या ऐतिहासिक विजयानंतर, अमित शहा आणि त्यांचं काहीतरी बिनसलं होतं. त्यामुळेच बिहार विधानसभेच्या निवडणुकीत, त्यांनी मोदी-शहांऐवजी नितीश-लालूंसाठी रणनीती आखली होती आणि त्यांना सत्तेपर्यंतही पोहोचवलं होतं. पंजाबमध्ये त्यांनी काँग्रेसचं विजयाचं स्वप्न साकार केलं होतं.