नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या काळात रमजान महिना सुरु असल्याने मतदानाचा वेळ बदलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. रमजानच्या महिन्यात मतदानाचा वेळ बदलता येणार नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मतदानाच्या वेळेबद्दल निर्णय घ्यायचे सर्व अधिकार निवडणूक आयोगाचे असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने यावेळी व्यक्त केले.
मुस्लीम समाजात रमजानचा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लीम समाजात उपवास ठेवण्याची प्रथा आहे. याशिवाय, मे महिन्यामुळे तीव्र उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे उपवास असलेले व्यक्ती घराबाहेरही जास्त पडत नाहीत. याचाच आधार घेत वकील निजामुद्दीन पाशा यांनी रमजान दरम्यान मतदान सकाळी सात ऐवजी पहाटे पाच वाजता सुरू करण्यात यावं अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. निवडणूक आयोगाची परवानगी नसेल तर मतदानाची वेळ बदलता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
रमजानमध्ये मतदान करण्याच्या वेळेत बदल करण्याच्या मागणीला काही मुस्लिम संघटनांनी पाठिंबाही दर्शवला होता तर काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. फक्त रमजानसाठी वेळ बदलता येणार नसल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवला आहे