ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 6 - काशीमधील अस्सी घाट येथे हिरव्या रंगाचा शर्ट घातलेली एक 75 वर्षीय व्यक्ती एखाद्या सर्वसामान्य पर्यटकाप्रमाणे तुमच्या बाजूने निघून गेली तर आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण हा त्यांचा रोजचा दिनक्रम आहे. पण सोमभाई कोणीही सर्वसामान्य व्यक्ती नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू आहेत. एकाच आठवड्यात दुस-यांदा वाराणसी दौ-यासाठी आलेले सोमभाई सांगतात की, 'त्यांच्या या दौ-याचा आणि रविवारी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोचा काही संबंध नाही'.
'या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडून दिल्या आहेत', असंही सोमभाई सांगतात. पंतप्रधान मोदी रोड शोसाठी वाराणसीत पोहोचण्याच्या काही वेळ आधीच सोमभाई पोहोचले होते. ते सांगतात 'मी दोन वेळा येथे आलो आहे. मात्र याचा प्रचाराशी काही एक संबंध नाही. मी येथे फिरण्यासाठी आलो आहे, लोकांशी बोलतो आहे, त्यांना भेटतो आहे. येथील लोकांमधील आक्रोश मला दिसत आहे'.
गंगेत जाऊन डुबकी मारण्याआधी सोमभाई यांनी समाजवादी पक्षाचं घोषवाक्य 'काम बोलता है'वर चांगलीच सडकून टीका केली आहे. ते म्हणतात 'गेल्या 10 वर्षात साधा एक पूलही बांधू शकले नाहीत. मिरजापूरमध्येही हीच स्थिती आहे. आधी मुलायम, नंतर मायावती आणि आता अखिलेश. जनता सर्व पाहत असून ते निर्णय घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणीही लोकांच्या ह्रदयातून काढू शकत नाही'.