- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजप २०१९ च्या निवडणुका पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वातच लढविणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष अमित शहा यांचा कार्यकाळ पुढे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सूत्रांनी सांगितले की, अमित शहा यांचा कार्यकाळ जानेवारीत संपणार होता. हा कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय दिल्लीत शनिवारी सुरु झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पहिल्या दिवशी घेण्यात आला. पक्षाच्या अध्यक्षपदाची पुढील निवडणुकही स्थगित करण्यात आली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चेहरा बनविण्याचा निर्णय यापूर्वी पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. मोदी सरकारच्या शपथग्रहण सोहळ्यानंतर शहा यांची आॅगस्ट २०१४ मध्ये भाजपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.२०१९ मध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याचा संकल्प करतानाच शहा यांनी असा दावा केला की, यावेळेचा विजय २०१४ पेक्षा मोठा असेल. ‘अजेय भाजप’चा नारा देतानाच त्यांनी सांगितले की, भाजपकडे जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शहा यांचा कार्यकाळ जानेवारीत समाप्त होणार आहे. पण, याच काळात डिसेंबरमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मेघालयमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मेघालय वगळता अन्य सर्व राज्य लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या निवडणुकांनंतर देशात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु होईल. त्यामुळे भाजपने संघटनात्मक निवडणूक स्थगित करुन लोकसभा निवडणुकांनंतर अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
२०१९ च्या निवडणुका अमित शहांच्या नेतृत्वातच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 4:58 AM