Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणीकीसाठी पाच टप्प्यातील मतदान झाले असून, आणखी दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. ओडिशा राज्यातील पुरी मतदारसंघासाठी येत्या 25 मे रोजी मतदान होईल. अशातच राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भाजपवर भगवान जगन्नाथाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला.
संबित पात्रांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे म्हटले की, 'श्री जगन्नाथ साऱ्या विश्वाचे भगवान आहेत. महाप्रभूंना एका मानवाचा भक्त म्हणणे म्हणजे ईश्वराचा अपमान आहे. तेअशा विधानांमुळे जगभरातील जगन्नाथ भक्त आणि उडिया लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.' तर, दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी पटनायक यांच्या पोस्टला रिट्विट करत म्हटले, 'भाजपच्या या विधानाचा तीव्र निषेध करतो. ते स्वतःला देवाच्या वर समजू लागले आहेत. देवाला मोदी भक्त म्हणणे हा देवाचा अपमान आहे.'
काँग्रेसने शेअर केला तो व्हिडिओ काँग्रेस नेते श्रीनिवास बीवी यांनी पुरी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संबित पात्रा ओरिया भाषेत बोलत असल्याचे दिसत आहे. पात्रा यांनी आपल्या वक्तव्यात भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यावरुन विरोधक भाजपवर जोरदार टीका करत आहेत.