लखनऊ : उत्तर प्रदेशाच्या अवध परिसराकडे देशाचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या सात महिला नेत्या येथे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नेहरू-गांधी घराण्यातील सोनिया गांधी आणि मनेका गांधी अनुक्रमे रायबरेली आणि सुलतानपूर मतदारसंघांमधून निवडणूक लढवीत आहेत.
मनेका गांधी व सोनिया गांधी या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या स्नुषा आहेत. सोनिया गांधी चौथ्यांदा रायबरेलीतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आतापर्यंत पिलीभीतमधून निवडून येणाऱ्या मनेका गांधी यंदा सुलतानपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मुस्लीम मतदारांना उद्देशून केलेल्या विधानामुळे मनेका गांधी वादग्रस्त ठरल्या. त्यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाने ४८ तास बंदी आणली होती
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या विरोधात लखनऊमधून समाजवादी पक्षातर्फे लढणाºया पूनम सिन्हा या अभिनेते-खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी आहेत. शत्रुघ्न कॉँग्रेसतर्फे पाटणासाहिब मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या विरोधात उभे आहेत.कॉँग्रेसच्या माजी खासदार राजकुमारी रत्ना सिंग प्रतापगढमधून तर उत्तर प्रदेश सरकारमधील महिला आणि बालकल्याण मंत्री, रिटा बहुगुणा-जोशी याही अलाहाबादमधून निवडणूक लढवीत आहेत. रिटा बहुगुणा या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या कन्या असून, त्या अलीकडेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्या. रिटा यांची इंदिरा गांधी यांच्याशी जवळीक होती. रत्ना सिंग या इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय व माजी परराष्ट्रमंत्री राजा दिनेश प्रताप सिंग यांच्या कन्या असून तीनदा त्या खासदार होत्या. दिनेश प्रताप सिंग अनेक वर्षे उत्तर प्रदेश सरकारमध्येही मंत्री होते.
अमेठीत स्मृती इराणींचे आव्हानअमेठी मतदारसंघातून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आव्हान देत आहेत. राहुल गांधी यांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याच्या मुद्द्यावर त्या प्रचार करीत आहेत. सर्व महिला उमेदवारांपैकी स्मृती इराणी या कॉँग्रेसशी कधीही संबंध नसलेल्या उमेदवार आहेत. उन्नाव मतदारसंघातून कॉँग्रेसच्या माजी खासदार अन्नू टंडन या भाजपचे साक्षी महाराज यांच्या विरोधात निवडणूक लढवीत आहेत.