रायगढ - छत्तीसगडमध्ये एका माजी कलेक्टरला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत उमेदवारी मिळाली म्हणून या आयएएस अधिकाऱ्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. खरसिया विधानसभा मतदारसंघातून भाजपने ओ.पी. चौधरी यांना तिकीट दिले होते. मात्र, काँग्रेस उमेदवार उमेश पटेल यांनी 8250 मतांनी चौधरी यांचा पराभव केला.
छत्तीसगडमध्ये चौधरी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तेलही गेलं तूपही गेलं अन् हाती धोपाटणं आलं, अशी अवस्था या उमेदवाराची झाली आहे. कारण, निवडणूक लढविण्यासाठी चौधरी यांनी नोकरीचा राजीनामा दिला, त्यामुळे नोकरीही गेली अन् आमदारकीही मिळाली नाही. आता, केवळ भाजपा कार्यकर्ता म्हणूनच या उमेदवाराला फिरावे लागणार आहे. मात्र, पराभव झाल्यानंतरही चौधरी यांनी विजयी उमेदवाराची गळाभेट घेत मैत्रीपूर्ण लढतीचा संदेश दिला. ज्यावेळी चौधरी हे उमेश पाटील यांना भेटायला निघाले होते, त्यावेळी आता गोंधळ होईल असे पोलिसांना वाटले. पण, चौधरी यांनी जादू की झप्पी दिल्यानं पोलिसांचा ताण हलका झाला.
चौधरी यांचा पराभव करणारे उमेश पटेल हे काँग्रेसचे कद्दावर नेता राहिलेल्या नंदकुमार पटेल यांचे पुत्र आहेत. त्यामुळे उमेश पटेल यांना पराभूत करणे हे भाजपासाठी मोठे आव्हान होते. मात्र, 12 वर्षे आयएएस म्हणून नोकरी करणाऱ्या ओपी चौधरी यांनी भाजपाकडून उमेदवारी घेतली. त्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामाही दिला. त्यामुळे भाजपाला विजयाची खात्री वाटत होती. मात्र, भाजपा अन् ओपी चौधरी यांचा पराभव झाला. छत्तीसगड येथून 2005 च्या बॅचचे आयएएस ओपी चौधरी यांनी आमदारकीसाठी एका झटक्यात 12 वर्षांच्या नोकरीचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भागातील शैक्षणिक कामाची दखल घेऊन तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते 2011-12 मध्ये पंतप्रधान एक्सलंट अवॉर्डनेही चौधरी यांना सन्मानित करण्यात आलं होतं. नोकरीत अतिशय चांगल काम सुरू असतानाही चौधरी यांनी राजीनामा देत भाजपाकडून निवडणूक लढवली. मात्र, दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. त्यामुळे तेलही गेलं अन् तूपही... हाती धोपाटणं आलं, अशीच अवस्था ओपी चौधरी यांची झाली आहे.