इटानगर - भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. अरुणाचल प्रदेशमधीलविधानसभा निवडणुकांध्ये भाजपाला हे यश मिळाले आहे. आलो ईस्ट आणि यचुली या दोन विधानसभा क्षेत्रातून भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. सर केंटो जिनी आणि ताबा तेडीर यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. याबाबत गृहराज्यमंत्री किरण जिजिजू यांनी ट्विट करुन माहिती दिली.
देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. काँग्रेसने अरुणाचलमध्ये 53 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र, अरुणाचल प्रदेशमध्ये एकूण विधानसभा उमेदवारांसाठी 60 जागा आहेत. सध्या येथे भाजपाचे सरकार असून पेमा खांडू हे तेथील मुख्यमंत्री आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये 11 एप्रिल रोजी विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच भाजपाला एका जागेवर विजय मिळाला आहे. अरुणाचल प्रदेशमधील 31 आलो ईस्ट या विधानसभा मतदारसंघात भाजपाने बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. केंटो जिनी हे भाजपाचे उमेदवार या जागेवर निवडून आले आहेत.
अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 मार्च होती. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केंटो जिनी यांच्याविरुद्ध एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे कुठलाही उमेदवार विरुद्ध नसल्याने केंटो जिनी यांना विजयी घोषित करण्यात आले. अरुणाचल वेस्टचे खासदार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. तर दुसरा उमेदवारही निवडून आल्याचं किरण रिजिजू यांनी सांगितलं. ताबा तेडीर हे दुसरे उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. 16 यचुली मतदारसंघात भाजपाला हा विजय मिळाला आहे. तेडीर यांच्याही विरुद्ध एकही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे भाजपाने या दोन जागेवर निवडणूक जिंकली आहे. दरम्यान, या निवडणुकांतील विजयाचा भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो.