ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - मणिपूरमधील मानवी हक्क कार्यकर्त्या इरॉम शर्मिला यांनी १६ वर्षापासून सुरु असलेले बेमुदत उपोषण संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मणिपूरमध्ये लष्कराला विशेष अधिकार देणारा एएफएसपीए कायदा रद्द करावा या मागणीसाठी शर्मिला मागच्या १६ वर्षांपासून बेमुदत उपोषण करत आहेत.
येत्या नऊ ऑगस्टला त्या आपले उपोषण सोडणार आहेत. मणिपूरमध्ये लष्कर या कायद्याचा वापर करुन अत्याचार, अन्याय करत आहे असा त्यांचा आरोप होता.
माझ्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. उपोषण करण्याऐवजी मी आता निवडणूक लढवून हा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करीन असे इरॉम शर्मिला यांनी सांगितले.
इरॉम नोव्हेंबर २००० पासून उपोषणाला बसल्या होत्या. इम्फाळ विमानतळाजवळच्या बसस्टॉपवर सुरक्षा दलाकडून १० जणांची हत्या झाल्यानंतर एएफएसपीए कायदा रद्द करण्यासाठी शर्मिला बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या.