नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशचे मतदान संपले आहे आणि गुजरातच्या दुस-या व शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी होत असून, दोन्ही राज्यांचे निकाल पुढील सोमवारी, १८ डिसेंबरला लागणार आहेत. त्यानंतर दोन महिन्यांत ईशान्येकडील त्रिपुरा, नागालँड व मिझोरम या राज्यांच्या निवडणुका होतील. यापैकी एका राज्यांत भाजपाची सत्ता नाही. त्यानंतर मेमध्ये कर्नाटकची निवडणूक असून, तिथे काँग्रेसकडून सत्ता खेचण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल.पुढील वर्षी एकूण आठ राज्यांत निवडणुका होत असून, त्यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपाची सत्ता आहे. गुजरातच्या निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने सारी ताकद लावण्याचे कारण वरील तीन राज्यांत पुढील वर्षी सत्ता मिळवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहे. गुजरात निवडणुकांचे निकाल मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडवर पडतील, असे काँग्रेसला वाटत आहे. या तीन राज्यांत नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये निवडणुका होतील. मिझोरमच्या निवडणुकाही नोव्हेंबरातच होतील, अशी अपेक्षा आहे.गुजरातवर सारे अवलंबूनअर्थात काँग्रेसची सारी गणिते, आडाखे हे गुजरातच्या निकालांवर अवलंबून आहे. त्या जिंकता आल्या वा जागांमध्ये चांगली वाढ झाली, तर काँग्रेस नेते व कार्यकर्ते यांच्यात हुरूप येईल.पक्षाध्यक्षपदी एकमताने निवड झालेल्या राहुल गांधी यांचीही ताकद गुजरातच्या निवडणुका वाढवतील, असे आताचे तरी चित्र आहे.आसामची पुनरावृत्ती?ईशान्येकडील वरील चारपैकी एकही राज्यात भाजपाची सत्ता नाही. आसाम व अरुणाचल प्रदेशात ज्या पद्धतीने सत्ता मिळवली, तशीच या राज्यांत मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न राहील. मात्र तिथे सध्या भाजपा नसल्यागतच आहे. कर्नाटकही भाजपाला स्वत:कडे हवे आहे. मात्र ते प्रयत्न करताना, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड टिकवणे हेही भाजपापुढे मोठे आव्हान असेल.चौहान यांच्या मागे व्यापमंमध्य प्रदेशात भाजपाचे शिवराम सिंह चौहान हे सलग १२ वर्षे मुख्यमंत्रीपदी आहेत. निवडणुका होतील, तेव्हा त्यांचे १३ वे वर्ष असेल. व्यापमं घोटाळा, शेतकरी आत्महत्या याद्वारे त्यांना अडचणीत आणण्याचे काँग्रेसचे प्रयत्न राहतील. त्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे. कमलनाथ, दिग्विजय सिंग हे आताच एकत्र आल्याचे दिसत आहे. सलग इतकी वर्षे चौहान सत्तेत असल्याने मतदार पर्याय म्हणून आपल्याला विजयी करतील, असे काँग्रेसला वाटत आहे.रमणसिंग यांची १३ वर्षेछत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग २00३ पासून सत्तेवर आहेत. प्रस्थापित सरकार पक्षाविरोधी वातावरणाचा फायदा मिळावा, असे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. मात्र त्यासाठी राज्यात काँग्रेसने आतापासून करायला हवी, ती जुळवाजुळव सुरू केलेली नाही. शिवाय काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय असा चेहरा दिसत नाही.वसुंधरा राजे विरुद्ध अशोक गेहलोतराजस्थानमध्ये मात्र काँग्रेसकडे अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोन नेते आहेत, ज्यांच्या आधारे काँग्रेस विधानसभा निवडणुका भाजपाशी सामना करणार आहे. अशोक गेहलोत हे याआधी दोनदा मुख्यमंत्री होते आणि त्यांची प्रतिमाही चांगली आहे. सचिन पायलट लोकसभा सदस्य आहेत. तिथेभाजपाच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशी काँग्रेसला सामना करावा लागणार आहे. त्या २00३ ते २00८ या काळातही मुख्यमंत्री होत्या. आरक्षण, गोरक्षकांचा धुमाकूळ, भाजपा नेत्यांची वसुंधरा राजे यांच्याविषयीची नाराजी याचा फायदा मिळवणे हे काँग्रेसचे लक्ष्य आहे.
पुढील वर्षी आठ राज्यांत निवडणुका; पाच राज्यांत विरोधक सत्तेत, तीन राज्ये टिकवण्याचे भाजपापुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 5:12 AM