हरीश गुप्ता, नवी दिल्लीमहत्त्वाच्या उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केल्या असून पहिले मतदान ४ फेब्रुवारी रोजी पंजाब व गोवा राज्यात तर १५ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये होईल.राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत मतदान ११ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान चालेल. मणिपूरमध्ये ४ आणि ८ मार्च रोजी मतदान होईल. पाचही राज्यांतील मतमोजणी ११ मार्च रोजी होईल.पंजाब (मित्रपक्ष अकाली दलासह) आणि गोवा राज्यात सत्ता आपल्याकडेच कशी कायम राहील यासाठी भाजपाच्या नेतृत्वाला कठोर परिश्रम करावे लागतील तर महत्त्वाच्या उत्तर प्रदेशात सत्ता प्राप्त करण्यासाठी त्याने काहीही उणीव राहू नये, असे प्रयत्न चालवले आहेत. चलनातून ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याच्या निर्णयावर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांतून जणू सार्वमतच होईल, असे समजले जात आहे. तथापि, भाजपाच्या दोन प्रवक्त्यांनी नोटाबंदीच्या विषयावर या निवडणुकांचे निकाल हे सार्वमत असणार नाहीत, असे स्पष्ट केले. या निवडणुकांचे विषय हे स्थानिक असतात व त्यावरच त्या लढवल्या जातात, असे जीव्हीएल नरसिंह राव म्हणाले. भाजपाचे प्रयत्न उत्तराखंड व मणिपूरमध्ये सत्तेसाठी आहेत. परंतु मोदी यांच्यासाठी उत्तर प्रदेशची निवडणूक खरीखुरी परीक्षा ठरणार आहे.मतमोजणी ११ मार्च रोजीपाच राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी बुधवारी सकाळी येथे जाहीर केला. ते म्हणाले, ‘‘उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत ४०३ विधानसभा मतदारसंघांत मतदान ११, १५, १९, २३, २७ फेब्रुवारी आणि ४ व ८ मार्च रोजी होईल. पाच राज्यांतील ६९० मतदार संघांसाठी १६ कोटींपेक्षा जास्त मतदार आपला हक्क बजावतील. या निवडणुकांसाठी आयोगाने १.८५ लाख मतदान केंद्रे असून २०१२ मध्ये जेवढी मतदान केंद्रे होती त्यापेक्षा यंदा ती १५ टक्क्यांनी जास्त आहेत. नसीम झैदी यांच्यासोबत ए.के. जोती व ओ.पी. रावत हे निवडणूक आयुक्तही उपस्थित होते.