लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पंधरा राज्यांतील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने गुरुवारी केली. अकाली दलाचे राज्यसभेतील प्रतिनिधित्व संपुष्टात येण्याची आणि अलीकडेच शंभर सदस्यांचा आकडा गाठणाऱ्या भाजपचे संख्याबळही कमी होण्याची शक्यता आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यांत वेगवेगळ्या तारखेला सदस्य निवृत्त होत असल्याने या रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. अधिसूचना २४ मे रोजी जारी करण्यात येणार असून, १० जून रोजी मतदान घेतले जाईल.
निवृत्त होणाऱ्या प्रमुख सदस्यांत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी, अंबिका सोनी, जयराम रमेश, कपिल सिब्बल (काँग्रेस) आणि बसपचे सतीश चंद्र मिश्रा यांचा समावेश आहे. २१ जून आणि १ ऑगस्टदरम्यान हे सदस्य निवृत्त होणार आहेत. २४५ सदस्य असलेल्या राज्यसभेत भाजपचे सध्या ९५ सदस्य असून, काँग्रेसचे २९ आहेत.
उत्तर प्रदेशचे ११, महाराष्ट्र आणि तमिळनाडूचे प्रत्येकी ६ आणि आंध्र प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकचे प्रत्येकी ४ सदस्य निवृत्त होत आहेत. मध्य प्रदेश आणि ओडिशाचे प्रत्येकी ३ तसेच तेलंगणा, छत्तीसगढ, पंजाब, झारखंड आणि हरयाणाचे प्रत्येकी २ आणि उत्तराखंडचे एक सदस्यही निवृत्त होत आहेत.
भाजपला आंध्र प्रदेश, झारखंड आणि राजस्थानमध्ये हादरा बसू शकतो. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधून याची भरपाई होण्याची भाजपला आशा आहे. आंध्र प्रदेशातील भाजपच्या तीन सदस्यांचीही मुदत संपत आहे. पंजाबचे अकाली दलाचे एकमेव सदस्य बलविंदर सिंग, काँग्रेसच्या अंबिका सोनी यांच्या रिक्त होणारी जागा आम आदमी पार्टीचे सदस्य घेऊ शकतात. कारण पंजाब विधानसभेतील प्रचंड संख्याबळ पाहता आम आदमी पार्टी या दोन्ही जागा जिंकू शकते.