लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जून-जुलैमध्ये होतील की, ऑक्टोबरमध्ये याचा फैसला सुप्रीम कोर्टात मंगळवारी होईल. राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी आहे.
निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश ४ मे रोजी कोर्टाने आयोगाला दिले. मुंबईसह १४ महापालिकांची अंतिम प्रभाग रचना १८ मे रोजी जाहीर होईल. कोर्टाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू केली तरी ३१ जुलैनंतरच प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे आयोगाला शक्य होईल. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसामुळे निवडणुका घेणे शक्य होणार नाही, अशी असमर्थता आयोगाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या अर्जात व्यक्त केली आहे.
विनंती मान्य झाली नाही तर काय?
जुलै किंवा फार तर ऑगस्टमध्ये निवडणूक घेण्याशिवाय पर्याय नसेल. महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात व २५ जिल्हा परिषदा, त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्या आणि दोन हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घ्यायच्या असाही पर्याय आहे. सर्वच निवडणुका एकाच टप्प्यात आणि जुलै-ऑगस्टमध्येच घ्या, असे न्यायालयाने बजावले तर ऐन पावसाळ्यात निवडणुकांचा फड रंगू शकतो.