माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एक देश एक निवडणुकीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सोपविला आहे. यावर चर्चा सुरू असताना निवडणूक आयोग आज लोसकभा निवडणुकीचे बिगुल फुंकणार आहे. अशातच लोकसभेबरोबर पाच राज्यांच्या निवडणुकाही लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एक देश, एक निवडणूक हे जरी सध्या स्वप्नवत असले तरी कोविंद यांच्या समितीने या निवडणुका २०२९ मध्ये शक्य असल्याचे म्हटले आहे. तसेच दोन टप्प्यांत या निवडणुका घेण्याचेही सुचविले आहे. लोकसभा आणि राज्यांच्या निवडणुका एका टप्प्यात आणि नंतर १०० दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे प्रस्तावित आहे. परंतु आज निवडणूक आयोग लोकसभेबरोबर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकतो.
आंध्र प्रदेश, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ जून महिन्यात संपत आहे. लोकसभा निवडणूक मे महिन्याच्या अखेरपर्यंत चालणार आहे. अशावेळी या राज्यांच्या निवडणुका लोकसभेबरोबरच उरकल्या जाण्याची शक्यता आहे.
तसेच पाचवे राज्य म्हणजे जम्मू काश्मीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षीच या राज्याती निवडणूक सप्टेंबर २०२४ पर्यंत घेण्याचे आदेश दिले होते. यामुळे या राज्याचाही समावेश होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाहीय. आर्टिकर ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन भाग करत केंद्र शासित प्रदेश करण्यात आले आहेत.
लोकसभेबरोबर अरुणाचल प्रदेशच्या निवडणुका एकत्र होण्यावर भाजपाने संकेत दिले आहेत. कारण पक्षाने ६० उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत चार महिला आहेत. यामुळे ही निवडणूक एकत्र होणार असल्याची दाट शक्यता आहे.