नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2022) पूर्ण झाल्यामुळे केंद्र सरकार या राज्यांमध्ये कोरोना लसीकरण (COVID-19 Certificates) प्रमाणपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पुन्हा छापण्याचा विचार करत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आणि आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर 8 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांतील लसीकरण प्रमाणपत्रांवरून नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला होता.
एका अधिकृत सूत्राने सांगितले की, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या राज्यांमध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्याबाबत सर्वोच्च प्राथमिकतेच्या आधारावर पुन्हा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, "या पाच राज्यांतील लोकांना देण्यात येणाऱ्या कोरोना प्रमाणपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यासाठी को-विन प्लॅटफॉर्मवर आवश्यक बदल केले जातील," असे सूत्राने पीटीआयला सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सांगितले की, आतापर्यंत 12-14 वयोगटातील एक कोटीहून अधिक मुलांना कोरोनावरील लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण 16 मार्चपासून सुरू झाले. त्यांना कॉर्बेव्हॅक्स लस दिली जात आहे, ज्याचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातील.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले आहे की, "12-14 वयोगटातील 1 कोटीहून अधिक मुलांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरण झालेल्या माझ्या सर्व तरुण योद्ध्यांचे अभिनंदन. ही गती कायम ठेवा!". दरम्यान, गेल्या वर्षी 1 मार्चपर्यंत देशात 12 आणि 13 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या 4.7 कोटी होती. देशात आतापर्यंत कोविड-19 विरोधी लसीचे एकूण 182.55 कोटी डोस देण्यात आले आहेत.