नवी दिल्ली - लोकसभा 2019 च्या निवडणुकांसाठी मोठ्या राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. काँग्रेसकडून राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येत आहे. तर भाजपकडून मिशन 2019 चा नारा देत अमित शाहंचे अध्यक्षपद कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, तत्पूर्वी देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार आहे. त्यामध्ये, राजस्थान, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, मिझोरम आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे.
तेलंगणामध्ये राज्य सरकार बरखास्त करण्यात आल्यानंतर तेथील निवडणुकांसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तर, तेलंगणातील निवडणुकांसाठी थांबण्याची गरज नसल्याचेही चंद्रशेखर राव यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लवकरच तेलंगणा राज्यातही निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यातच, निवडणूक आयोगाने राजस्थान, मिझोरम, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रमा आखण्यास सुरुवात केल्याचे समजते. निवडणूक आयोगानुसार, डिसेंबरमध्ये या चार आणि सोबतच तेलंगणा राज्यात निवडणुका घेण्यात येतील. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजविण्याचा विचार निवडणूक आयोग करत आहे. कारण, त्यानंतर 4 ते 5 महिन्यांतच लोकसभेच्या निवडणुकांची तयारी आयोगाला करावी लागणार आहे. मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ 15 डिसेंबर रोजी संपत आहे. तर छत्तीसगढ येथील 5 जानेवारी 2019 रोजी संपुष्टात येत आहे. तसेच मध्य प्रदेशचा 7 जानेवारी आणि राजस्थान विधानसभेचा कार्यकाळ 20 जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे या पाच राज्यांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून निवडणूक आयोगाने तशा हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.