SBI Electoral Bonds Data: गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मुद्द्याची देशभरात चर्चा सुरू होती, त्या इलेक्टोरल बाँड्सबाबत निवडणूक आयोगाने काल(दि.14) महत्वाची माहिती दिली. आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर केला. कंपन्यांनी किती देणगी दिली आणि पक्षांना किती देणगी मिळाली, याचा तपशील समोर आला आहे. पण, या यादीमध्ये कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला देणगी दिली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, सोमवारपर्यंत याचा तपशील समोर येणार आहे.
दरम्यान, काल निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीत अनेक अशा कंपन्या आहेत, ज्यांच्यावर यापूर्वी सीबीआय, ईडी आणि आयटीने छापे टाकले. विशेष म्हणजे, यातील 3 कंपन्यांनी तपास यंत्रणांच्या कारवाईदरम्यान निवडणूक रोखे खरेदी केले आहेत. यामध्ये फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि खाण कंपनी वेदांतचा समावेश आहे.
1- निवडणूक आयोगाने दिलेल्या तपशिलानुसार, फ्युचर गेमिंग कंपनीने सर्वाधिक 1368 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले. 2019, 2022 आणि 2024 मध्ये कंपनीच्या कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते आणि याच काळात कंपनीने बिनदिक्कतपणे निवडणूक रोखे खरेदी केले. ही लॉटरी उद्योगाशी संबंधित कंपनी असून तिचा मालक लॉटरी किंग सँटियागो मार्टिन आहे.
कंपनीच्या दक्षिण आणि उत्तर-पूर्वेकडील 13 राज्यांमध्ये शाखा आहेत. जुलै 2019 मध्ये कंपनीवर ईडीने टाकलेल्या छाप्यात 250 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती, तर 2 एप्रिल 2022 रोजी टाकलेल्या छाप्यात 409.92 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. यानंतर 7 एप्रिल रोजी कंपनीने 100 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले. लॉटरी नियमन कायदा, 1998 चे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. ईडीने म्हटले आहे की सँटियागो मार्टिन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 1 एप्रिल 2009 ते 31 ऑगस्ट 2010 या कालावधीत लॉटरी तिकिटांच्या माध्यमातून 910.3 कोटी रुपयांचा अवैध नफा कमावला. या वर्षी मार्च महिन्यात सँटियागो मार्टिनचा जावई आधव अर्जुन याच्या घरावरही छापे टाकण्यात आले होते.
2- दुस-या क्रमांकावर हैदराबादची मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आहे, जिने 5 वर्षांत सुमारे 1000 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले. कृष्णा रेड्डी हे कंपनीचे मालक आहेत. आयकर विभागाने ऑक्टोबर 2019 मध्ये कंपनीवर छापा टाकला होता, तर ईडीनेही कंपनीशी संबंधित प्रकरणाची चौकशी केली. त्याच वर्षी 12 एप्रिल रोजी, कंपनीने एकाच दिवसात 50 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले. 12 एप्रिल 2019 ते 12 ऑक्टोबर 2023 या कालावधीत कंपनीने 966 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले.कंपनीने तेलंगणा सरकारसोबत कलेश्वरम धरण प्रकल्प, झोजिला बोगदा आणि पोलावरम धरण प्रकल्पात काम केले आहे.
3- तिसऱ्या क्रमांकावर अनिल अग्रवाल यांची खाण कंपनी वेदांता असून, कंपनीने 376 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले आहेत. ED ने 2018 च्या मध्यात कंपनीवर कारवाई केली होती. वेदांत ग्रुपशी संबंधित व्हिसासाठी लाच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. कंपनीवर बेकायदेशीरपणे चिनी नागरिकांना व्हिसा दिल्याचा आरोप होता. याशिवाय 2022 मध्ये ईडीने कंपनीविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणातही तपास सुरू केला होता. यानंतर 16 एप्रिल 2019 रोजी वेदांताने 39 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले. तर, पुढे 2020 ते 2023 दरम्यान कंपनीने 337 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे निवडणूक रोखे खरेदी केले.