लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहने आणि सामायिक वाहनांचा योग्य प्रकारे स्वीकार केल्यास २0३0 सालापर्यंत भारताचे पेट्रोल-डिझेलवर खर्च होणारे ६0 अब्ज डॉलर वाचू शकतात, असे निति आयोगाने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. निति आयोग आणि रॉक इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या ‘इंडिया लिप्स अहेड : ट्रान्स्फॉर्मिंग मोबिलिटी सोल्युशन’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालातील अंदाजानुसार, इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे २0३0 पर्यंत ६४ टक्के इंधन वाचेल, तसेच कार्बन उत्सर्जनात ३७ टक्के कपात होईल. वर्षाला १५६ दशलक्ष टन इंधन वाचू शकेल. सध्याच्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीच्या हिशेबाने २0३0 पर्यंत ३.९ लाख कोटी रुपये वाचू शकतील.अहवाल जारी करताना निति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी सांगितले की, कोणाला आवडो न आवडो इलेक्ट्रिक वाहने भारतात येणारच आहेत. आम्ही ते किती लवकर स्वीकारतो, तसेच किती प्रमाणात त्यांचा प्रसार होतो, हाच काय तो प्रश्न आहे. इलेक्ट्रिक वाहने बॅटरीवर चालतात. बॅटऱ्यांच्या किमती झपाट्याने कमी होत आहेत. साधारणत: चार ते पाच वर्षांत बॅटऱ्यांच्या किमती अर्ध्याने उतरत आहेत. बॅटरीवर चालणारी वाहने पेट्रोल-डिझेलच्या वाहनांपेक्षा स्वस्त होण्याचा काळ आता फार दूर नाही, तसेच बॅटरीवरील वाहन चालविण्याचा खर्च पेट्रोल-डिझेलवरील वाहनांपेक्षा २0 टक्के कमी असेल.कांत म्हणाले की, सुमारे दशकभराच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचा जोरदार प्रसार भारतात होईल; मात्र आम्ही त्याला उशीर केला, तर आम्हाला तेलाऐवजी बॅटऱ्या आयात कराव्या लागतील. या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी आपण गमावून बसू. त्यामुळे आपण आपला इलेक्ट्रिक वाहन विकास कार्यक्रम निश्चित केला पाहिजे. सरकारने यात पुढाकार घेतला पाहिजे. सरकारी वाहने इलेक्ट्रिक केल्यास खाजगी क्षेत्रातही त्याचा प्रसार होईल.
2030 सालापर्यंत इलेक्ट्रिक वाहने वाचवतील 60 अब्ज डॉलरचे इंधन
By admin | Published: May 13, 2017 12:18 AM