ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - भारतात इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ सुरु असतानाच देशात इंजिनीअर आणि इलेक्ट्रिशियनची कमाई समानच झाली आहे अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. देशात इंजिनीअरर्सची संख्या वाढत असतानाच फिटर्स, वेल्डर्स, इलेक्ट्रीशन्स, प्लंबर्स यांची संख्या घटल्याने या क्षेत्रातील कामगारांना 'अच्छे दिन' आल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
रोजगार क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका कंपनीने भारतातील वेतनविषयक सखोल अहवाल तयार केला आहे. यात इंजिनीअर आणि इलेक्ट्रिशियनची कमाई आता समान झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. नवख्या इलेक्ट्रिशियनचे सुरुवातीचे वेतन ११,३०० रुपये आहे. तर डेस्कटॉप इंजिनीअरचे सुरुवातीचे वेतन इलेक्ट्रियशनपेक्षा फक्त ३,५०० रुपयांनी जास्त आहे. तर आठ वर्षांनी डेस्कटॉप इंजिनीअरचे पगार ३० हजार रुपयांपर्यंत तर इलेक्ट्रिशियनचा पगारही २६ हजारांच्या घरात पोहोचतो असे अहवालात म्हटले आहे. पगारात ऐवढा कमी फरक येण्याचे कारणही अहवाल तयार करणा-या कंपनीने दिले आहे. आयटी क्षेत्रातील इंजिनीअरची संख्या दिवसेगणिक वाढत आहे. उदाहरणार्थ आयटी क्षेत्रासाठी सध्या चार लाख इंजिनीअर्सची आवश्यकता असून या जागांसाठी इच्छूक इंजिनीअर्सची संख्या १५ लाखांच्या घरात आहे. तर इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वेल्डर आणि फिटर या क्षेत्रांमध्ये १० जणांची आवश्यकता आहे. तर इच्छुकांची संख्या अवघी दोन आहे. यावरुन देशात इंजिनीअरपेक्षा कुशल कारागीरांची मागणी जास्त असून अनेक मोठ्या कंपन्या या कुशल कारागीरांना चांगला पगारही द्यायला तयार असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.