Video - बापरे! वीज बिल भरलं नाही म्हणून टीव्ही, फ्रीज, कूलर केलं जप्त, घरंही केलं सील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 02:51 PM2022-11-23T14:51:22+5:302022-11-23T15:00:20+5:30
वीज कंपनीने ग्राहकांकडून बिल वसुलीसाठी अवलंबलेल्या अजब पद्धतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
ग्राहक वेळेवर वीज बिल भरत नाही, तेव्हा त्यांना दंड आकारला जातो किंवा त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाते. पण मध्य प्रदेशमध्ये वीज बिलाच्या वसुलीचा अजब प्रकार समोर आला आहे. बिल भरत नसलेल्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. अशा लोकांविरोधात अभियान चालवण्यात येत आहे. एका वीज कंपनीने लोकांच्या घरातून थेट टीव्ही, फ्रीज, कूलर, हीटरसारख्या वस्तू जप्त केल्या आहेत.
मध्य प्रदेशमधील वीज कंपनीने ग्राहकांकडून बिल वसुलीसाठी अवलंबलेल्या अजब पद्धतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन ही घटना घडली आहे. जिथे एका वीज कंपनीने बिल गोळा करण्यासाठी लोकांच्या घरातील सामान उचलण्यास सुरुवात केली. रविवारी सात जणांच्या घरांमधून फ्रीज, टीव्ही, कुलर, हीटर आणि इतर वस्तू जप्त केल्याचा दावा करण्यात आला होता.
बकाया बिल जमा नही करने पर बिजली कंपनी ने उपभोक्ता के घरों से उठाए फ्रिज, टीवी और कूलर@OfficeofSSC@OfficeOfKNath@digvijaya_28@PradhumanGwl
— Ravi Sen (@ravisen0734) November 21, 2022
. pic.twitter.com/XZ7dvqvWp4
जप्त केलेल्या सामानातून मिळालेल्या रकमेतून बिलाची भरपाई केली जाईल. वीज कंपनीशी संबंधित राजेश हारोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोक विजेचा वापर करत आहेत. पण बिलं भरताना त्याकडे दुर्लक्ष करतात, बिल भरत नाहीत. काही लोकांवर तर तब्बल 90 हजार रुपयांपेक्षा जास्त बिल आहे. लोकांनी बिल न भरल्याने कंपनीने लोकांच्या घरातील वस्तू जप्त करण्यास सुरुवात केली आहे.
ज्या घरांतून माल जप्त करण्यात आला आहे, तिथे दोन-तीन वर्षांपासून वीज बिल जमा झालेले नाही. सुमारे 200 लोकांकडे वीज कंपनीचे 1.70 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या लोकांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, त्यापैकी 70 जणांनी वीज बिल जमा केलं आहे. उरलेल्यांनी गांभीर्याने न घेतल्यामुळे असं कठोर पाऊल उचलण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"