- शीलेश शर्मानवी दिल्ली : गुजरातमध्ये वीज घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, मोदी सरकार ते रूपानी सरकारवर वीज खरेदी सौद्यावरून प्रश्नांचा भडिमार केला आहे. सरकारी वीजप्रकल्पांची उत्पादन क्षमता कमी करून, विजेची मागणी पूर्ण करण्यास खासगी कंपन्यांकडून चढ्या दराने ६२ हजार ५४९ कोटींची वीजखरेदी करण्यात आली. त्यामुळे कंपन्या मालामाल झाल्या व फटका मात्र वीजग्राहकांना सोसावा लागत आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.सन २००२ ते २०१६ या काळात चार खासगी कंपन्यांकडून वीजखरेदी करण्यात आली. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला की, सरकारने आधी वीजप्रकल्पांची उत्पादन क्षमता कमी करून, टंचाईच्या नावाखाली चार कंपन्यांवर मेहेरबानी केली. २०१३-१४मध्ये अदानी कंपनीकडून ३,४७१ कोटी, एस्सारकडून १,५७४ कोटी, टाटाकडून २,५५१ कोटी आणि चायना लाइट कंपनीकडून ६१२ कोटी रुपयांची वीजखरेदी करण्यात आली. हा प्रकार चालूच असून, २०१५-१६ पर्यंतच्या आकडेवारीवरून अदानीकडून १०,८९८ कोटी, एस्सारकडून ४,८४२ कोटी, टाटाकडून ८,४९१ कोटी आणि चायना लाइटकडून १,९६६ कोटींची वीजखरेदी करण्यात आली, असे सुरजेवाला यांनी सांगितले.राज्य सरकारच्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या एकूण उत्पादन क्षमतेपेक्षा ३३ ते ३८ टक्के कमी वीजनिर्मिती करण्यात आली, असा आरोप आहे.
गुजरातेत वीज खरेदी घोटाळा?, काँग्रेसचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 2:16 AM