Electricity Bill: उन्हाळ्यात विजेचा वापर अचानक वाढतो. विजेचा वापर वाढला की साहजिकच बिलही वाढेल. परंतु अनेक वेळा वीज बिल अवाक्याच्या बाहेर येते. अनेकदा ग्राहक वाढीव वीज बिल कमी करण्यासाठी संबंधित विभागाच्या चकरा मारतात. पण, उत्तर प्रदेशातील एका तरुणाने बिल कमी करण्यासाठी एक जीवघेणा प्रकार केला.
हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यातील सराय अकील पोलीस स्टेशन परिसरातील नंदा गावातील आहे. वीज बिल जास्त आल्याने संतापलेला तरुण चक्क एका हाय टेंशन लाइनवर चढला. हाय टेंशन लाइनवर बसलेल्या व्यक्तीला पाहून ग्रामस्थ घाबरले. त्याला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि 5 तासांच्या अथक परिश्रमानंतर त्याला खाली आणले.
तरुणाला आले 80 हजाराचे बीलअशोक निषाद असे या तरुणाचे नाव असून, वाढीव बिलामुळे तो खूप तणावाखाली आला होता. या घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि निषाद यांना त्यांच्या तक्रारीची दखल घेण्याचे आश्वासन दिले. निषादची पत्नी मोना देवी यांनी दावा केला आहे की, वाढत्या वीज बिलामुळे पती तणावाखाली होता. 80,700 रुपयांचे वीज बिल आल्यानंतर निषादने गेल्या दोन दिवसांपासून नीट जेवणही केले नव्हते. बिल न भरल्यामुळे घराचे वीज कनेक्शन तोडण्यात आले, त्यांची तक्रारही अधिकारी ऐकत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तरुण खाली आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.