नवी दिल्ली : यंदा मान्सून लांबल्याने विजेची मागणी वाढली आहे. मात्र, वीज उत्पादक सरकारी कंपनी एनटीपीसीकडे केवळ दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे मोठे वीजसंकट उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रीय ऊर्जा प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वांत मोठी वीज उत्पादक कंपनी असलेल्या एनटीपीसीच्या सहा प्रकल्पांमध्ये कोळशाच्या साठ्याची स्थिती चिंताजनक आहे. देशभरातील १०० पैकी ४६ प्रकल्पांत सात दिवस पुरेल एवढाच इंधन साठा शिल्लक आहे. एनटीपीसीने गेल्या १४ जुलै रोजी ऊर्जा मंत्रालयास लिहिलेल्या पत्रात यासंबंधीचा इशारा दिला होता. सरकारी कंपनी कोल इंडियाकडून पुरवठ्यात घट झाल्याने या वीज प्रकल्पांना संकटाचा सामना करावा लागत आहे. एनटीपीसीसह तिच्या उपकंपन्या वार्षिक अंदाजाच्या तुलनेत कमी प्रमाणात वीजपुरवठा करीत आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बाराव्या योजनेत सरकारने पारंपरिक स्रोतांद्वारे ८८,५३७ मेगावॅट आणि अपारंपरिक स्रोतांद्वारे ३०,००० मेगावॅट वीज उत्पादन करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. एप्रिल-जून या कालावधीत देशांत विजेच्या मागणी-पुरवठ्यात ५,२९५ मेगावॅटची तूट होती. सध्या देशाची एकूण वीज उत्पादन क्षमता ११३,२८० मेगावॅट एवढी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
देशावर वीजसंकट
By admin | Published: July 18, 2014 3:15 AM