ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर एका फटक्यात 500 आणि 1 हजार रुपयाच्या नोटेचे महत्व शून्य झाले. इतक्या नोटांचे करायचे काय ? असा प्रश्न अनेकांना पडला होता. बेकायदेशीर मार्गाने ज्यांनी पैसा कमावला त्यांनी नोटा जाळल्या, नदीत फेकून दिल्या. अजूनही जुन्या नोटांचे करायचे काय? असा प्रश्न काहीजणांसमोर असताना ओदिशाच्या नौपाडा जिल्ह्यातील एका 17 वर्षीय युवकाने यावर नामी शक्कल शोधून काढली आहे.
या मुलाने जुन्या 500 च्या नोटेपासून वीज निर्मितीचे तंत्र विकसित केल्याचा दावा केला आहे. राष्ट्रीय पातळीवर या उपक्रमाची दखल घेण्यात आली असून, पंतप्रधान कार्यालयाने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला यासंबंधी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. लाचमन दुंडी असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो, खारीअर कॉलेजचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. 500 रुपयाच्या जुन्या नोटेजून पाच वॉल्ट वीज निर्मिती शक्य असल्याचे या मुलाने सांगितले.
वीज निर्मितीसाठी लाचमन नोटेमध्ये जे सिलिकॉन कोटींग आहे त्याचा वापर करतो. नोट फाडून सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर इलेक्ट्रीक वायरच्या मदतीने सिलिकॉन प्लेटला ट्रान्सफॉर्मरशी जोडतो. त्यातून वीज निर्मिती होत असल्याचे लाचमनने सांगितले. दुंडी याचा दावा पडताळून बघण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने 12 एप्रिल रोजी राज्य सरकारला पत्र लिहीले.
17 मे रोजी ओदिश सरकारने संबंधित खात्याला दुंडी यांच्या प्रोजेक्टवर अभ्यास करुन पंतप्रधान कार्यालयाला अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले. पंतप्रधान कार्यालयाने माझ्या शोधाला मान्यता दिली तर, तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल असे दुंडीने सांगितले. नोटाबंदीनंतर जुन्या नोटांच्या पूनर्वापराचा मी उत्तम पर्याय शोधलाय असे त्याने सांगितले. 500 रुपयाची नोट फाडल्यानंतर मला त्यात सिलिकॉन प्लेट आढळली आणि तिथून पुढे माझा शोध सुरु झाला. दुंडीने आतापर्यंत त्याच्या कॉलेजमध्ये हा प्रयोग करुन दाखवलाय. तिथे कोणी दखल घेतली नाही तेव्हा त्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले.