नवी दिल्ली - भारताच्या विद्युतीकरण कार्यक्रमामुळे विजेच्या उपलब्धतेत लक्षणीय वाढ झाली आहे. याअंतर्गत विजेपासून वंचित असलेल्या १३ छोट्या गावांपैकी एक आणि सात ग्रामीण कुटुंबाला वीज जोडणी मिळाली आहे. या कार्यक्रमामुळे विद्युत दिवे आणि पंखे यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे, मात्र अधिक महाग उपकरणे घेण्यात वाढ झाली नाही.
राजीव गांधी ग्राम विद्युतीकरण योजना, २००५ मध्ये सुरू करण्यात आली, यात चार लाखांहून अधिक गावांना वीज पुरवण्याचे उद्दिष्ट होते. ‘जर्नल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’त प्रकाशित अभ्यासानुसार, लहान गावांमध्ये विजेची उपलब्धता वाढली, मात्र, याचा आर्थिक परिणाम गावाच्या आकारानुसार बदलत राहिला.
अभ्यासात काय?शिकागो विद्यापीठातील व मेरीलँड विद्यापीठातील संशोधकांनी यावर संशोधन केले. ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमामुळे विजेची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढली आहे, १३ पैकी एक लहान गाव (सुमारे ३०० रहिवासी) आणि सातपैकी एका ग्रामीण कुटुंबाला वीज मिळाली असल्याचे संशोधनात म्हटले आहे.
नेमका परिणाम काय?३०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या खेड्यांमध्ये आर्थिक वाढ झाली नाही. २,००० लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांमध्ये विद्युतीकरणानंतर लक्षणीय आर्थिक वाढ नोंदवली गेली. या मोठ्या गावांमध्ये दरडोई मासिक खर्च जवळजवळ दुप्पट झाला असून, यात दरमहा १,४२८ रुपयांची वाढ झाली आहे.