या वर्षाच्या सुरुवातीला अयोध्येतील राम मंदिरामध्ये झालेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेपासून कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अयोध्या चर्चेत आहे. दरम्यान, मागच्या काही दिवसांमध्ये अयोध्येतील राम मंदिरात झालेली पाण्याची गळती, रामपथावरील रस्त्याची झालेली दुरवस्था यावरूनही अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. दरम्यान आता, अयोध्येतील राम पथावर लावण्यात आलेल्या विजेच्या दिव्यांची चोरी झाल्याचा आरोप केला जात आहे. रामपथावर दिवे लावण्याचा ठेका मिळालेल्या ठेकेदाराने ५० लाख रुपयांहून अधिक किमतीचे दिवे चोरीस गेल्याचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असली तरी येथे चोरी होऊच शकत नाही असा दावा केला आहे
याबाबत अयोध्येचे आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले की, ठेकेदाराने विजेचे दिवे चोरीस गेल्याचा आरोप केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजेचे दिवे चोरीस जाणं शक्य नाही. कारण अयोध्येमध्ये दिवसरात्र पोलिसांची गस्त असते. सुमारे ३६०० दिवे चोरीस गेल्याचा दावा केला जात आहे. मात्र तरीही आम्ही या प्रकरणाचा तपास करणार आहोत.
मात्र या आरोप प्रत्यारोपांमुळे आता अयोध्येतील रामपथावर लावण्यात येणाऱ्या विजेच्या दिव्यांच्या कामात घोटाळा झाल्याच्या आरोपांना उधाण आलं आहे. ठेकेदाराने जे दिवे चोरीस गेल्याचा दावा केला आहे ते लावलेच गेले नाहीत असा दावा करण्यात येत आहे. आता विजेचे दिवे चोरीस गेले की लावण्यातच आले नाहीत, हे आता तपासामधून समोर येणार आहे. मात्र जर हे विजेचे दिवे लावलेच गेले नसतील, तर तो उत्तर प्रदेशमधील मोठा घोटाळा ठरेल. कारण हे प्रकरण थेट रामलल्लांशी संबंधित आहे. एवढंच नाही तर रामललांवर श्रद्धा असलेल्या कोट्यवधी लोकांच्या भावनेशी निगडित आहे.