नवी दिल्ली : सध्या देशातील अनेक शहरातील महागड्या विजेमुळे जनता त्रस्त आहे. यातच आता देशाची राजधानी दिल्लीत राहणाऱ्या लोकांना महागाईचा झटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीत वीज महाग होऊ शकते. दिल्ली विद्युत नियामक आयोगाने (DERC) वीज खरेदी करारावर दर वाढवण्याची परवानगी दिली आहे.
दिल्लीत वीज १० टक्के महाग होऊ शकते. बॉम्बे सबर्बन इलेक्ट्रिक सप्लायने (BSES) वीज खरेदीबाबत डीईआरसीकडे अर्ज केला होता, त्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय दिल्ली सरकार घेणार आहे. या वाढीव दराचा वीज बिलात समावेश करायचा की नाही, हे सरकारने ठरवायचे आहे. याआधीही वीज खरेदी कराराचे दर वाढले असताना सरकारने वीज कंपन्यांना स्वत: खर्च उचलण्यास सांगितले होते. त्यामुळे लोकांच्या बिलात फरक पडला नाही.
रिपोर्टनुसार, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली, नवी दिल्ली, जुनी दिल्ली आणि दिल्लीच्या ट्रान्स यमुना भागात राहणाऱ्या लोकांना वीज दरवाढीचा फटका बसणार आहे. यासोबतच एनडीएमसी म्हणजेच नवी दिल्ली परिसरालाही याचा फटका बसणार आहे. जे बीवायपीएलद्वारे वीज घेत आहेत, त्यांना ९.४२ टक्के अतिरिक्त दर भरावा लागेल. त्याचबरोबर जे बीआरपीएल ग्राहक आहेत, त्यांना ६.३९ टक्के अधिक वीज बिल भरावे लागणार आहे.
याशिवाय, एनडीएमसी भागात राहणाऱ्यांना फक्त २ टक्के कर भरावा लागेल. या कंपन्यांनी गेल्या वर्षी आयोगाला पत्र लिहून पीपीएसीमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. दरम्यान, ज्या भागात टीपीडीडीएल म्हणजेच Tata Power Delhi Distribution Limited वीज पुरवत आहे, फक्त त्या लोकांना दिलासा मिळाला आहे, कारण टाटाने वीज वाढवली नाही. टाटा दिल्लीच्या काही भागात वीज पुरवते.