नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात वीजपुरवठा तब्बल तीन तास ठप्प झाला. याच दरम्यान विविध वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना उपचारासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता. धक्कादायक बाब म्हणजे हे रुग्णाच्या जीवावर बेतलं आहे. एका महिला रुग्णाला उपचारादरम्यान जीव गमवावा लागला आहे. मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले. त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. इलेक्ट्रिक पॅनलमध्ये बिघाड झाल्याने रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील कोटा येथील वैद्यकीय महाविद्यालयात हा भयंकर प्रकार घडला आहे. वीज गेल्यानंतर एका वृद्ध महिलेवर उपचार सुरू होते. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने महिलेची प्रकृती बिघडू लागली. तेथे उपस्थित डॉक्टरांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाखाली त्यांच्यावर उपचार केले, मात्र त्यांचा जीव वाचवण्य़ात अपयश आले. नंदूबाई असं मृत महिलेचे नाव आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
रुग्णालयांमध्ये वीज खंडित झाल्यानंतर प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था केली जाते. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना त्रास सहन करावा लागू नये, पण कोटामधील न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये अशी व्यवस्था नसल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. अचानक वीज गेल्याने काही काळ व्हेंटिलेटरचा बॅकअप सुरू होता. पण त्यानंतर तो बॅकअपही संपला. यात रुग्णालय प्रशासनाने अन्य व्यवस्था करणे आवश्यक मानले नाही. मात्र, रुग्णालय प्रशासन चूक मान्य करायला तयार नाही.
नंदूबाई यांची मुलगी मधु मौर्य हिने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालय व्यवस्थापन तीन तास लाईटची व्यवस्था करू शकले नाही आणि आईचा जीव गेला. घटनेच्या दिवशीच सकाळी मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. नंदूबाईंना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते. मोबाईलच्या प्रकाशात त्यांना सीपीआर देण्यात आला. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रशेखर सुशील यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी रुग्णालयाच्या पॅनलमध्ये मोठा स्फोट झाला आणि 3 तास लाईट नव्हती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.