ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूरभंज जिल्ह्यात जंगली हत्तीच्या हल्ल्यात एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीय तिच्यावर अंत्यसंस्कार करत असताना हत्तीने पुन्हा येऊन तिचा मृतदेह चितेवरून उचलून नेला.
या घटनेचे वर्णन करताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, माया मुर्मू नावाची ही महिला गुरुवारी सकाळी रायपाल गावातील ट्यूबवेलमधून पाणी काढत होती. त्याचवेळी दलमा वन्यजीव अभयारण्यातून भटकणाऱ्या जंगली हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला असं या घटनेचे वर्णन करताना पोलिसांनी सांगितले. हत्तीने महिलेला चिरडले आणि त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती रसगोविंदपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक लोपामुद्रा नायक यांनी दिली.
मृतदेहालाही सोडलं नाहीत्याच दिवशी संध्याकाळी माया मुर्मूचे कुटुंबीय तिच्यावर अंत्यसंस्कार करत असताना अचानक हा जंगली हत्ती तिथे पोहोचला आणि महिलेचा मृतदेह चितेतून उचलला. एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार हत्तीने महिलेचा मृतदेह पायाखाली चिरडला, नंतर तो उचलला आणि फेकून दिला. त्यानंतर त्यानं तेथून पळून गेला. मृत महिलेवर काही तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यापूर्वी फेब्रुवारीमध्ये ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातही अशा प्रकारची घटना घडली होती. या घटनेत ऋषी जेरेई नावाच्या ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर वडील रासनंद जेरेई हे गंभीर जखमी झाले होते. ही घटना पश्चिमांचल रेंज अंलावेरणी फॉरेस्ट सेक्शन अंतर्गत महुलडगर गावात घडली होती.