विमानतळाच्या रनवेवर येते मिरवणूक, वर्षांतून १० तास विमानांची उड्डाणे बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 11:23 AM2022-11-01T11:23:30+5:302022-11-01T11:34:00+5:30
मंदिरातून निघालेली भाविकांची यात्रा म्हणजेच मिरवणुकीमुळे हे विमानतळ ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येते
तिरुवअनंतपूरम - केरळच्या तिरुवअनंतपूरम येथील राष्ट्रीय विमानतळ हे कायमच गजबजलेलं असतं. मात्र, वर्षातून दोनवेळा हे विमानतळ ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येतं. मंगळवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत हे विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. त्यावेळी, विमानतळावरुन कुठल्याही विमानाचे उड्डाण झाले नाही. विशेष म्हणजे वर्षातून दुसऱ्यांदा ही प्रथा पाळली जाते. कारण, धार्मिक कारणास्तव, परंपरेनुसार हे विमानतळ वर्षातून १० तासांसाठी बंद ठेवण्यात येते.
मंदिरातून निघालेली भाविकांची यात्रा म्हणजेच मिरवणुकीमुळे हे विमानतळ ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येते. कारण, ही मिरवणूक एअरपोर्टच्या रनवेवरुनच निघते. ज्यामध्ये, हजारो भाविकांसह हत्तींचाही समावेश असतो. विशेष म्हणजे या मिरवणुकीला तब्बल ५ हजार वर्षांची परंपरा आहे. कोरोनापूर्वी म्हणजेच लॉकडाऊनच्या काही दिवस अगोदरही ही मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली होती. या उत्सवासाठी वर्षांतून दोनदा विमानतळ बंद ठेवण्यासाठी विमानतळाकडून एअरमेनला नोटीस पाठविण्यात येतं. त्यानुसार यंदा १ नोव्हेंबर रोजी हा उत्सव होत आहे. त्यासाठी, आज सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत येथील विमानतळावरुन कुठल्याही विमााचे उड्डाण किंवा लँडींग होणार नाही. या वेळांत ४ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह एकूण ६ विमानांचे उड्डाण थांबविण्यात येते.
वर्षाच्या सुरुवातीला प्रथम मार्च-एप्रिल महिन्यात पेनकुनी उत्सवादरम्यान आणि दुसऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अराट्टू मिरवणूक काढण्यात येते. श्री भगवान विष्णू यांना पद्मनाभ स्वामी मंदिरातून पालखीत बसवून मिरवण्यात येते. विमानतळाच्या पाठीमागे असलेल्या शांघमुघम समुद्रकिनारी नेण्यात येते, तेथे भगवान विष्णूजींना स्नान करवण्यात येते. अशी परंपरा जोसापली जाते. दरम्यान, ही परंपरा ५ हजार वर्षांपूर्वीची असून १९३२ मध्ये येथील विमानतळ बांधण्यात आलं आहे. त्यामुळे, ही पंरपंरा जपत भाविकांच्या श्रद्धेचा आदर करत विमानतळाची सेवा वर्षातून दोनवेळा ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येते. तेव्हाच यासंदर्भात परवानगी देण्यात आली आहे.