झारखंड: दक्षिण भारतातील लोक स्वत:चा प्रांत आणि मातृभाषेच्याबाबत किती कडवट असतात, याचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. मात्र, एका प्रसंगामुळे दक्षिण भारतातील प्राणीही मातृभाषेबाबत किती आग्रही असू शकतात, याचे प्रत्यंतर नुकतेच आले. यामधील मजेचा भाग सोडला तर झारखंडमधील पालमाऊ व्याघ्र अभयारण्यात खरोखरच असा प्रसंग उद्भवला आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वी कर्नाटकातून काळभैरव, सीता आणि मृगसेन हे तीन हत्ती आणण्यात आले होते. मात्र, या हत्तींना लहानपणापासून केवळ कानडी भाषेतील सूचना ऐकण्याची सवय असल्यामुळे पालमाऊ व्याघ्र प्रकल्पातील स्थानिक माहुतांची चांगलीच गोची झाली आहे. कर्नाटकमधील बंदीपूर राष्ट्रीय अभयाअरण्यात असणाऱ्या या हत्तींना महिन्याभरापूर्वी झारखंडमध्ये आणण्यात आले होते. मात्र, येथे आणल्यानंतर स्थानिक माहुतांकडून हिंदी भाषेत दिल्या जाणाऱ्या सूचना ऐकून या हत्तींचा गोंधळ उडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाषेचा हा अडसर दूर करण्यासाठी या हत्तींच्या मूळ माहुतांना कर्नाटकातून पाचारण करण्यात आले आहे. कर्नाटकातील हे माहूत हत्तींच्या नव्या मालकांना कानडी भाषा शिकवत आहेत. त्याचवेळी हत्तींनाही हिंदी भाषा शिकवण्याचा द्राविडी प्राणायाम सध्या पालमाऊ व्याघ्र प्रकल्पात सुरू आहे. जेणेकरून भविष्यात हत्ती आणि माहुतांच्या संभाषणात कोणतेही अडथळे येऊ नयेत. हत्तींना केवळ उच्चारशास्त्र आणि हावभावांची भाषा कळते. साहजिकच हिंदी आणि कानडी भाषेतील उच्चार वेगवेगळे आहेत. त्यामुळे कर्नाटकातून झारखंडमध्ये आणल्यानंतर हत्तींना माहुतांकडून सूचना स्वीकारताना गोंधळल्यासारखे होत आहे. याठिकाणी जंगल सफारीसाठी या हत्तींचा वापर होणार होता. परंतु, हिंदीतील सूचनाच या हत्तींना समजत नसल्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणासाठी अधिक वेळ लागत असल्याची माहिती झारखंड वन्यजीव मंडळाचे सदस्य डॉ. डी.एस. श्रीवास्तव यांनी दिली. सध्या लाल बिहारी व योगेंद्र हे झारखंडमधील माहूत काळभैरव हत्तीचा मूळ माहूत मंजूल याच्याकडून कानडी भाषेचे धडे घेत आहेत. तर सीता आणि मृगसेन या दोन हत्तींना रामप्रसाद व बीरेंद्रकडून प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी या हत्तींचे मूळ माहूत मारी यांची मदत घेतली जात आहे. भाषेचा हा गोंधळ दूर झाल्यानंतर मंजूल आणि मारी कर्नाटकमध्ये परततील, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.
दक्षिणेचे हत्तीही मातृभाषेवर ठाम, माहुतांना करावा लागतोय 'द्राविडी प्राणायाम'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 1:17 PM