नवी दिल्ली - आयआयटी दिल्लीने 26 ऑगस्ट रोजी एक जाहिरात प्रसिद्ध केली असून सोशल मीडियावर आयआयटी दिल्लीला ट्रोल करण्यात येत आहे. कुत्रा सांभाळण्यासाठी चक्क इंजिनिअर पदवीची पात्रता या जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. तसेच, या पदासाठी तब्बल 45 हजार रुपये मासिक वेतन असणार आहे. त्यामुळे, भारतीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिल्लीच्या प्रशासकीय विभागाला टार्गेट करण्यात येत आहे.
आयआयटी दिल्लीने ही जाहिरात प्रकाशित केल्यानंतर जाहिरातीच्या पत्रकासह संस्थेला ट्रोल करण्यात येत आहे. ट्विटरवरुन नेटीझन्सने चांगलाच समाचार घेतला असून केवळ कुत्रा सांभाळण्यासाठी कशाला हवी इंजिनिअरिंगची पदवी? असा प्रश्नही नेटीझन्स विचारत आहेत. त्यानंतर, आयआयटी दिल्ली प्रशासनाकडून परिपत्रक काढून याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ही जाहिरात प्रिटींग मिस्टेक असून नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. तोपर्यंत यापूर्वीी जाहिरात रद्द करण्यात येत आहे, असे दिल्ली आयआयटीने म्हटले आहे.
संस्थेच्या परित्रकानुसार आयआयटी दिल्लीत कुत्रा सांभाळण्यासाठी एक पद रिक्त असून या पदासाठी पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, बीए, बीएससी, बी.कॉम किंवा बीई पदवीधारकांनाच यासाठी अर्ज करता येणार आहे. या पदासाठी तब्बल 45,000 रुपये महिना वेतन देण्यात येणार आहे. या पदासाठी देण्यात येणाऱ्या पगारावरुनही संस्थेवर टीका करण्यात येत आहे. दिल्ली पोलीस विभागात याच पदासाठी केवळ 20,000 रुपये मासिक वेतन आहे. त्यामुळे, ही जाहिरात चर्चेचा विषय आणि टीकेचा धनी बनली आहे.
दरम्यान, या पदाच्या जाहिरातीनुसार अर्जदाराकडे चार चाकी वाहन असणे बंधनकार आहे. कारण, तत्काळ सेवेत कुत्रा दवाखान्यात देण्यासाठ कार गरजेची असल्याचं म्हटलं आहे. वय वर्षे 21 ते 35 पर्यंतचा भारतीय नागरिक असलेला पुरुष किंवा महिला या पदासाठी अर्ज करु शकतात. हे पद ३ महिन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने असणार आहे, काम पाहून पुढे हे कॉन्ट्रॅक्ट वाढविण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.