ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग संपवण्यासाठी दिल्लीतील एका २५ वर्षीय महिलेने आरोग्य मंत्रालयातील निवृत्त अधिकारी विजय कुमारची हत्या केली. मयूर विहारमधील रहात्या घराच्या बेडरुममध्ये विजय कुमार यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत बुधवारी सापडला होता. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या.
दक्षिण दिल्लीतील पालम येथील घरातून आरोपी महिलेला अटक करण्यात आली. मोबाइल कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी संबंधित आरोपी महिलेला अटक केली. विजयकुमारने आरोपी महिलेबरोबरच्या लैंगिक संबंधांचे चित्रीकरण केले होते. या चित्रीकरणावरुन तो पिडित महिलेला ब्लॅकमेल करत होता.
ऑक्टोंबर २०१४ मध्ये प्रथम आरोपीची विजय कुमारबरोबर ओळख झाली. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून विजय कुमारने या महिलेचे लैंगिक शोषण चालवले होते. ऑक्टोंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या कालावधील सातवेळा विजयकुमारने या महिलेला घरी बोलवून तिचे लैंगिक शोषण केले. काहीवेळा विजयकुमारसोबत त्याचे मित्रही होते.
आपण संताप आणि नैराश्यातून ही हत्या केली असे आरोपी महिलेने सांगितले. विजयकुमार आरोपी महिलेला व्हिडीओ क्लीप पतीला पाठवण्याची धमकी देऊन तिचे शोषण करत होता. मुली आणि पत्नी घरी नसताना विजयकुमार आरोपी महिलेला घरी बोलवून घेत असे. विजय कुमारची किचनमधल्या चाकूने भोसकून हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपी महिला विजय कुमारच्या बेडरुममधील टीव्ही सोबत घेऊन गेली. एकदा विजयकुमारने तिला टीव्हीमध्ये ब्लॅकमेलिंगसाठी वापरत असलेली व्हिडीओ क्लीप दाखवली होती. ती क्लीप नष्ट करण्यासाठी नजफगड येथील एका गटारात तिने तो टीव्ही टाकून दिला.