योगेश पांडेनागपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांचे अंदाज धुळीला मिळवत भाजपने चौथ्यांदा सत्ता काबीज केली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या मतांमध्ये १३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे छत्तीसगडमधील स्थानिक व प्रादेशिक पक्षांची सद्दीच यंदा संपल्याचे चित्र आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या पारड्यात ८८ टक्क्यांहून अधिक मते आली आहेत. त्यामुळे स्थानिक पक्षांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२०१८ च्या निवडणुकीत भाजपला ३२.९७ टक्केच मते मिळाली होती. मात्र, यंदा त्यात १३.३ टक्क्यांनी वाढ होत तो आकडा ४६.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे. काँग्रेसची ६८ वरून थेट ३५ जागांवर घसरण झाली असली तरी मतांच्या आकडेवारीत फारसा फरक पडलेला नाही. २०१८ मध्ये प्रादेशिक पक्षांनी चांगली कामगिरी करत २३.९९ टक्के मते घेतली होती. यंदा त्यांची प्रचंड पीछेहाट झाली असून, अनेक पक्षांचा अक्षरश: सफाया झाला आहे.
नक्षलग्रस्त भागात डाव्यांचे कंबरडे मोडलेदक्षिण छत्तीसगडमधील अनेक जागा नक्षलग्रस्त भागात येतात. तेथे मान्यता नसलेले मात्र डाव्यांचा वरचष्मा असलेले अनेक पक्ष आहेत. शिवाय, सीपीआय (एम) व सीपीआयदेखील आहे. यंदा या दोन्ही पक्षांना केवळ ०.४३ टक्के मते मिळाली आहेत.
‘नोटा’च्या पर्यायाकडे पाठ२०१८ मध्ये छत्तीसगडमध्ये १.९८ टक्के म्हणजेच २.८२ लाख मतदारांनी ‘नोटा’चा प्रयोग केला होता. मात्र, यावेळी मतदारांनी ‘नोटा’पेक्षा त्यांना योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला मत देण्यावर भर दिला. ‘नोटा’ची टक्केवारी १.२६ टक्क्यांवर घसरली.