नवी दिल्ली: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस ओटीटी विनरर एल्विश यादव मोठ्या अडचणीत आला आहे. नोएडात झालेल्या रेव्ह पार्टीत विषारी सापांच्या विषाद्वारे नशा करण्यात आली. या प्रकरणात एल्विशचे नाव आले आहे. रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष आणल्याचा आरोप एल्विशवर आहे. याप्रकरणी एल्विशवर अटकेची टांगली तलवार आहे. दरम्यान, भाजप खासदार मनेका गांधी यांनीही एल्विशच्या अटकेची मागणी केली असून, हा माणूस टीआरपीसाठी काहीही करयला तयार होतो, अशी टीका त्यांनी केली आहे.
मनेका गांधी म्हणाल्या की, एल्विश निर्दोष असेल, तर तो फरार का झालाय? त्याच्यावर आमची आधीपासून नजर होती. तो गळ्यात साप टाकून व्हिडिओ शूट करायचा आणि सापांची विक्रीही करायचा. हे दुर्मिळ साप बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. याप्रकरणी सात वर्षांपर्यंतची शिक्षेची तरतूद आहे. हा माणूस टीआरपी वाढवण्यासाठी काहीही करायला तयार असतो. त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी मनेका यांनी केली आहे.
काय प्रकरण आहे?नोएडा पोलिसांनी रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याच्या आरोपाखाली पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणी बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादव याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांकडून नऊ सापांची सुटका करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. हे लोक गुरुवारी सेक्टर-51 मधील बँक्वेट हॉलमध्ये रेव्ह पार्टीसाठी जमले होते. पोलिसांनी सांगितले की, 'पीपल फॉर अॅनिमल्स' (पीएफए) ने यादव आणि इतर सहा जणांविरुद्ध सापाच्या विषासह रेव्ह पार्टी केल्याप्रकरणी तक्रार केल्यानंतर, वन्यजीव संरक्षण तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एल्विश यादवने आरोप फेटाळले
संपूर्ण प्रकरणावर आता एल्विशची प्रतिक्रिया समोर आली आहे. एल्विशने त्याच्या ट्वीटरवरुन एक व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्याविरोधात सध्या अनेक गोष्टी पसरवल्या जात आहेत. एल्विश यादवला अटक केल्याच्या बातम्याही माझ्यापर्यंत आल्या आहेत. नशेच्या पदार्थांबरोबर एल्विशला पकडलं गेल्याचंही बोललं जात आहे. माझ्याबद्दल पसरणाऱ्या या गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसून त्या खोट्या आहेत. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. यामध्ये एक टक्काही सत्य नाही. मी उत्तर प्रदेश पोलिसांना सहकार्य करेन. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पोलिसांना मला सांगायचं आहे की यामध्ये मी सहभागी असेन, तर मला शिक्षेसाठी तयार आहे. पण, मीडियाने माझं नाव खराब करू नये." असं एल्विश म्हणाला.