बिग बॉस विजेता एल्विश यादव रेव्ह पार्टी प्रकरणी अडचणीत सापडला आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे, नोएडा पोलिसांनी रात्री उशिरा एल्विश यादवची चौकशी केली. पोलिसांनी एल्विश यादवला पोलीस ठाण्यात बसवून जवळपास ३ तास चौकशी केली आणि यादरम्यान एल्विशला अनेक प्रश्न विचारले.
नोएडामध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन आणि विदेशी मुलींना आमंत्रित करणे आणि विषारी सापांचे विष नशेसाठी वापरल्याबद्दल एल्विश यादव आणि काही अज्ञात लोकांसह सहा नावांच्या लोकांविरुद्ध सेक्टर-४९ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चीनने वाढवले भारताचे 'टेन्शन'; श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात पाठवली हेरगिरी करणारी अवाढव्य जहाजे
एल्विश यादव मंगळवारी रात्री उशिरा नोएडा पोलिसांसमोर हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. मीडियापासून वाचण्यासाठी एल्विश यादव गुपचूप पोलीस ठाणे गाठले होते. एल्विश यादवची सेक्टर-२० पोलिस ठाण्यात सुमारे ३ तास चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला जाण्याची परवानगी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्विश यादवची आज पुन्हा चौकशी होऊ शकते. नोएडा पोलिसांनी एल्विश यादवला रेव्ह पार्टी प्रकरणात चालू असलेल्या तपासात सामील होण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम ४१ अंतर्गत नोटीस पाठवली होती.
एल्विश यादवने नोएडा पोलिसांना स्वतःबद्दल आणि त्याच्या टीमबद्दल तसेच तो आयोजित केलेल्या कार्यक्रमांबद्दल माहिती दिली आहे. एल्विशची चौकशी करण्यासाठी, पोलिसांनी त्याने आतापर्यंत आयोजित केलेल्या सर्व पार्ट्यांचा तपशील आणि त्यात सहभागी झालेल्या लोकांची तसेच त्या पार्ट्यांचे फोटो आणि व्हिडिओ मागवले आहेत. इतकंच नाही तर पोलिसांनी एल्विश यादवच्या सोशल मीडिया अकाउंटचीही माहिती मागवली आहे. त्याच्या मोबाईल फोनचे संपर्क आणि तपशील तपासले जातील.
एल्विश यादवला आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या ५ सर्पमित्रांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. यासोबतच एल्विश आणि अटक आरोपी यांच्यातील परस्पर संबंधांबाबत केलेल्या आरोपांबाबतही प्रश्न विचारण्यात आले. आरोपी राहुल आणि एल्विश यादव यांच्यात काय संबंध आहेत, दोघेही एकमेकांना ओळखतात का, याची माहिती पोलीस घेत आहेत.