नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा दिला. ती काळीकुट्ट रात्र विसरणे शक्य नाही, असे सांगून लोकशाहीच्या रक्षणासाठी सतत जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. १९७५ मध्ये आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीविरुद्ध लोकशाहीप्रेमी लोकांनी दिलेल्या लढ्याला उजाळा देताना त्यांनी लोकशाहीभिमुख वारसा बळकट करण्याची गरज अधोरेखित केली. लोकशाही ही एक प्रणाली नाही, तर ती आमची संस्कृती असून, नित्य जागरूकता ही स्वातंत्र्याची किंमत आहे, असे ते म्हणाले. लोकशाहीवर प्रेम करणारी कोणतीही व्यक्ती विसरू शकणार नाही, अशी ती काळीरात्र होती. कोणताही भारतीय ती विसरू शकणार नाही. २५ जून १९७४ च्या त्या रात्री संपूर्ण देश तुरुंगात बदलून गेला होता. विरोधकांचा आवाज दाबला जात होता, असे ते म्हणाले.किदम्बीचे अभिनंदन-सरकारला कुठलीही वस्तू विकू इच्छिणाऱ्यांनी ई-जेमवर रजिस्टर करावे, गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस ई-जेमच्या माध्यमातून तुम्ही पारदर्शकता आणू शकाल, असे आवाहन मोदींनी केले. तसेच अंतराळ क्षेत्रात सातत्याने यशस्वी कामगिरी करीत असलेले इस्रोचे शास्रज्ञ आणि बॅडमिंटनमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या किदम्बी श्रीकांतचेही मोदींनी अभिनंदन केले.
मोदींकडून आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा
By admin | Published: June 26, 2017 1:06 AM